जिल्ह्यातील आदिवासी भागात हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
विजय राऊत
कासा : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो आदिवासी नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू तालुक्यांच्या दुर्गम भागातील नागरिकांना प्रत्यक्ष मीटरचे फोटो न घेता अंदाजे अवाच्या सवा बिल दिले जात आहे, हे बिल या नागरिकांना भरता येत नाही. त्यामुळे बिल न भरल्याने हजारो नागरिकांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात महावितरणचे कर्मचारी मीटरचे फोटो काढण्यासाठी जाण्यास टाळाटाळ करतात. तसेच महावितरणकडून सांगण्यात येते की, तुम्ही अँड्रॉइड फोनवरून तुमच्या मीटरचा फोटो अपलोड करा. म्हणजे मीटर रिडिंगप्रमाणे बिल येईल. परंतु आदिवासी भागातील नागरिक अशिक्षित आहेत. त्याचप्रमाणे गरिबीमुळे त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाहीत. तर बहुतांश ठिकाणी मोबाइलचे नेटवर्कसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहकांना स्वत:च्या मीटरचे फोटो काढून अपलोड करता येत नाहीत. त्यामुळे महावितरण देईल ते बिल भरण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीकही वाया गेले. गवत, पावली हे रोख पैसे मिळवून देणारे साधनही पावसामुळे सडून गेले. हाताला रोजगार नाही, पोटाला खायला आधार नाही, तर हे अवाच्या सवा येणारे वीज बिल कसे भरायचे? त्यामुळे वीज बिल भरले जात नाही. वीज बिल न भरल्यामुळे महावितरण वीजपुरवठा ताबडतोब खंडित करत आहे.
वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शाळेचे विद्यार्थी, आजारी व्यक्ती यांचे अतोनात हाल होत आहेत. वीज बिल कमी करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. म्हणून दुर्गम भागातील वीज ग्राहकांना नियमितपणे मीटर रिडिंग घेऊन वीज बिले द्यावीत अशी मागणी दुर्गम आदिवासी भागातील ग्राहकांकडून केली जात आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची संख्या
- डहाणू – एकूण ग्राहक ५५ हजार, वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक ३०७२
- तलासरी – एकूण ग्राहक २८ हजार, वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक ४३९१
- जव्हार – एकूण ग्राहक २५ हजार, वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक १६७१
- मोखाडा – एकूण ग्राहक १२ हजार ५००, वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक ११००
आमच्या घरी कधीही महावितरणचे कर्मचारी येऊन मीटरचे फोटो काढत नाहीत. त्यामुळे आम्हाला अंदाजेच बिल दिले जात आहे. सुरुवातीला अंदाजे आले तरी बिल व्यवस्थित येत होते. परंतु आता प्रत्यक्ष वीजवापरपेक्षा किती तरी अधिक युनिटचे बिल दिले जात आहे. त्यामुळे आम्हाला ते भरताही येत नाही. तरी प्रत्यक्ष मीटरप्रमाणे वीज बिल दिली जावीत. जादा युनिटच्या बिलाचे समायोजन करून बिल द्यावे.
– रामचंद्र भोये, त्रस्त वीज ग्राहक
