पालघर : पावसाची सुरुवात झाल्यापासून मागील आठवड्यापासून ग्रामीण भागासह शहरी भागात सतत वीज प्रवाह खंडित होण्याच्या घटना घडत आहे. केळवा, सफाळे, माहीम, डहाणू, जव्हार, चारोटी, बोईसर या भागात २४ ते ४८ तास वीज पुरवठा खंडित असल्याने पाणीपुरवठा, इंटरनेट सेवा व उद्योगावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली असून हवेतील आर्द्रतेत घट होऊन वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. मात्र असे असताना पावसाच्या सुरुवातीसोबत विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घडू लागले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माकुणसार, रामबाग, केळवे, सफाळे या भागात महावितरण कंपनीकडून उपकेंद्राला होणाऱ्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ३६ तासाहून अधिक काळ वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार घडले होते. दोन दिवसानंतर या भागातील वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला. मात्र पुन्हा याभागातील नागरिकांना मोठ्या अवधीसाठी वीज पुरवठा विना राहावे लागत आहे. यामुळे पर्यटन व्यवसायिकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या तीन दिवसापासून जव्हार, डहाणू या ग्रामीण भागातील वीज रात्री अपरात्री खंडित होत असल्याने व्यापारी, शेतकरी व गृहिणी, लहान मुले त्रस्त झाले आहेत. तसेच पावसाची संततधार सुरू असल्याने सर्वत्र मच्छरांचे प्रमाण वाढल्याने पंखा विना मच्छरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. डहाणू वरून येणाऱ्या मुख्यवीज वाहिन्याना वारंवार तांत्रिक बिघाड आणि विजेचा भर वाढल्याने वीजपुरवठा खंडित होतो. विजेवर अवलंबून असलेल्या लघु उद्योजक, पिठाची चक्की, झेरोक्स मशिन तसेच लहान मोठ्या व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
विशेष म्हणजे यासंदर्भात माहिती देण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात कोणताही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने तसेच महावितरण कंपनीकडून एसएमएस किंवा इतर माध्यमातून वीज प्रवाह खंडित होण्यामागील कारणाची माहिती दिली गेली नसल्याने नागरिकांना अनिश्चिततेच्या वातावरणात व अंधारात रात्र जागवून काढावी लागत आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांना वीज पुरवठा होत नसल्याने काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या, इंटरनेट सुविधा देखील बंद पडल्या आहेत. यासंदर्भात महावितरण कंपनीच्या पालघर चे कार्यकारी अभियंता सुनील भारंबे यांच्याशी संपर्क साधला असता केळवे येथील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. काही ठिकाणी झाडाची फांदी पडून वीजपुरवठा येत जात होता. चारोटी या भागात देखील विद्युत पुरवठा खंडित झाला असून काम सुरळीत असल्याचे त्यांनी सांगितले.