शुक्रवारी रात्री १० ते पहाटे चार वाजेपर्यंत वाहतूक बंद
पालघर : बहाडोली येथील महत्त्वाचा असलेला पूल शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी पहाटेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. पुलावरील रस्त्याच्या खड्डय़ांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने सुमारे सहा तास या पुलावरील वाहतूक बंद राहील. वाहनांनी व परिसरातील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले गेले आहे. वैतरणा नदीवरील महत्त्वाचा असलेला हा पूल अरुंद आहे. एका वेळी दोन वाहने जाणे अशक्य असल्यामुळे या पुलावर सिग्नल यंत्रणा कार्यरत आहे. पुलावरील रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
मनोर-पालघर रस्त्यापेक्षा पूल असलेल्या वरई- दहिसर- धुकटण या रस्त्याचा वापर केल्यामुळे मनोर येथील वाहतूक कोंडी टळते. तसेच हे कमी अंतर असल्याने वेळेची व इंधनाचीही बचत होते. त्यामुळे मुंबई-ठाणे भागातून पालघरकडे येणारी व मुंबई-ठाणेकडे जाणारी वाहने या रस्त्याचा वापर प्राधान्याने करतात. अलीकडील काळात या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. बहाडोली येथील खाडीपुलावरील रस्ता अरुंद आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणेद्वारे ठरविलेल्या वेळेद्वारे एकेरी वाहतूक येथे होत आहे. पुलावरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि वाहनचालकांकडून पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती. पुलावरील जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामानिमित्ताने महापालिकेला रस्त्याच्या खड्डेदुरुस्तीचा मुहूर्त सापडला आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग
मुंबई-ठाणे या ठिकाणी जाण्यासाठी मनोर मस्तान नाका व पुढे महामार्ग हा पर्यायी मार्ग आहे. मुंबई-ठाणे येथून पालघरला येण्यासाठीही हाच मार्ग सोयीचा आहे.
पुलावरील रस्ता सिमेंट काँक्रीटचा असल्याने दुरुस्तीनंतर किमान चार तास वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. वाहनचालकांची पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
– सौरभ वर्तक, कनिष्ट अभियंता, वसई-विरार महापालिका
