डहाणू : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इस्रो आणि वैज्ञानिकांची भेट घडवून आणणारी सहल प्रकल्पामार्फत आयोजित करण्यात आली आहे. बुधवार २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सहलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विद्यार्थ्यांना इस्रो आणि वैज्ञानिकांची भेट घडवून मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी १३ आश्रमशाळेतील प्रत्येकी दोन गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

इस्रोच्या माध्यमातून देशाने चांद्रयान ३ यशस्वी रित्या चंद्रावर पाठवून जगासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यामुळे जगभरातून इस्रोचे कौतुक केले जात असून याचा अनुभव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना घेता यावा, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी अभ्यास सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची इस्रो भेट घडवून आणली जात आहे.

हेही वाचा : पालघर : अपघातांमध्ये मृत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कामगारांचे कुटुंब नुकसान भरपाईपासून वंचित

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत १३ उच्च माध्यमिक विद्यालयातील २६ गुणवंत विद्यार्थ्यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली असून सोबत शिक्षक वृंद आणि सहकारी मिळून एकूण ३१ जन डहाणू येथून इस्रोसाठी रवाना झाले आहेत. इस्रोला भेट देऊन बंगलोर शहरातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना सहल घडवून आणण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

ग्रामीण आदिवासी बहुल भागातील निवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास प्रकल्प मार्फत वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवले जातात. मध्यंतरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. यावेळी देखील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग करून इतर शाळकरी विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला होता. त्यातच आता आयोजित इस्रो सहल विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनात भर टाकणारा असून त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड निर्माण होऊन ग्रामीण आदिवासी भागातून वैज्ञानिक घडवता येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा : तब्बल साडेचार लाख झाडांवर कुऱ्हाड, मुंबईची तहान भागवण्यासाठी वाड्यात गारगाई पाणी प्रकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा बाहेरील जगाशी संपर्क साधला जाणार आहे. इस्रो मध्ये गेल्यावर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनात भर पडणार असून त्यासह बंगलोर शहरातील प्रसिद्ध वस्तू संग्रहालय, उद्यान आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेट देता येणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही अभ्यास सहल खूप महत्वपूर्ण ठरणार आहे.” – संजिता मोहपात्र, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू