डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी बाईक राईडर्सच्या बेशिस्त ताफ्याबद्दल अनेक तक्रारी येत असतात, परंतु यावर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निघालेल्या १०० ते १५० बाईकर्सच्या ताफ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक दुचाकींवर अभिमानाने फडकत असलेल्या तिरंग्यामुळे हा प्रवास केवळ एक राईड न राहता, देशभक्तीचा एक आदर्श बनला. ठाणे, मुंबईहून निघालेल्या या राईडर्सनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुरक्षिततेचे नियम पाळून आंबोली येथील ‘अहुरा’ हॉटेलपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. यामध्ये चालकांकडून वेगाने गाडी चालवने, स्टंट करणे किंवा नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रकार दिसला नाही.

गेल्या काही वर्षांपासून सुट्टींच्या दिवशी मुंबई-ठाण्यातून येणारे बाईकर्स अनेकदा कर्कश आवाज आणि भरधाव वेगामुळे चर्चेत असतात. या बेशिस्तपणामुळे अनेक अपघात झाले आहेत, ज्यात काही तरुणांनी जीवही गमावला आहे. यामुळे महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी या राईडर्सना सूचना देण्यात आल्या आहेत. पण, यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निघालेल्या या राईडने एक सकारात्मक बदल घडवून आणला आहे. शिस्त आणि सुरक्षिततेचे पालन करत, या बाईकर्सनी केवळ एक प्रवास पूर्ण केला नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून देशाचा सन्मान केला. त्यांनी दाखवलेली ही परिपक्वता ‘बाईक राईड’ संस्कृतीला एक नवा चेहरा मिळाला आहे.

महामार्गावर नियमित प्रवास करणारे अनेक अनुभवी बाईकर्स नेहमीच नियमांचे पालन करतात, परंतु हौशी आणि नवख्या तरुण राईडर्सकडून अनेकदा चुका होतात. या बेशिस्त राईडर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी चारोटी, खाणीवडे आणि आंबोली येथे विशेष मोहीम राबवली आहे. अशा परिस्थितीत, स्वातंत्र्य दिनानिमित्त निघालेल्या या शिस्तबद्ध मिरवणुकीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. देशाच्या उत्सवाचा भाग होत असताना, प्रत्येक बाईक रायडरने वाहतुकीच्या नियमांचे पालन करत आणि जबाबदारीने प्रवास करत हा आदर्श कायम ठेवावा, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे. ही राईड केवळ एका दिवसाची घटना नसून, बाईकर्सच्या एका मोठ्या समूहाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून दिलेला एक सकारात्मक संदेश आहे.

स्वातंत्र्य दिनाची अनोखी राईड

स्वातंत्र्य दिनानिमित्त निघालेली ही राईड नेहमीच्या बाईक राईड्सपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. वेग आणि स्टंटबाजीची हौस बाजूला सारून, सुमारे १५० बाईकर्सनी केवळ शिस्त आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केले. दुचाकीवर डौलाने फडकत असलेल्या तिरंग्याने देशभक्तीचा संदेश दिला. या राईडने बाईकर्सना ‘बेफिकीर’ म्हणून पाहणाऱ्या समाजाच्या दृष्टिकोनात एक सकारात्मक बदल घडवून आणला. ही राईड केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नसून, जबाबदारीची आणि देशाबद्दलच्या आदराची ती एक प्रेरणादायी राईड ठरली.