डहाणू : डहाणू नगरपरिषदे हद्दीतील मंजूर डहाणू विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रुंदीवरून स्थानिक रहिवाशांचा विरोध पुन्हा एकदा वाढला आहे. या नियोजित रस्त्यांची रुंदी कमी करावी आणि खासगी जमिनींचे योग्य भूसंपादन करून मालकांना पुरेसा मोबदला द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ६ ऑगस्ट रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डहाणू नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार उपस्थित होते.
सध्या डहाणू ते चारोटी या राज्यमार्गाचे नूतनीकरण प्रस्तावित आहे आणि त्यासाठी कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे. या कामासाठी नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या असलेल्या भूसंपादनाला नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. रस्त्याची रुंदी ३० मीटर करण्याचे नियोजित असल्याने बैठकीमध्ये स्थानिकांनी रस्त्याची रुंदी ३० मीटरवरून २२ मीटर करण्याची मागणी केली. नागरिकांच्या या मागणीविषयी आमदार निकोले यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. लवकरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लोकांची बाजू त्यांच्यासमोर मांडली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
डहाणूच्या पश्चिम भागातील जवळजवळ ८० ते ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे, तर सागर नाका ते सरावली पर्यंतच्या पूर्व भागातील जमीन अधिग्रहण अजून बाकी आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिकांना भविष्यात फायदा होईल, असा प्रशासनाचा दावा आहे, तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी रेल्वे स्थानक ते सागर नाका या रस्त्याच्या रुंदीकरणात असमानता असल्यामुळे नागरिकांनी विरोध केला होता. त्यावेळीही संपूर्ण रस्त्याची रुंदी एकसमान ठेवण्याची मागणी पुढे आली होती. काही मालमत्ता धारकांनी विरोध दर्शवून न्यायालयात जाण्याची तयारीही दाखवली होती, तर काहींनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या भूसंपादनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
झाडे तोडण्याला विरोध
डहाणू-चारोटी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेची झाडे तोडण्यासाठी डहाणू पर्यावरण प्राधिकरणाकडे परवानगी मागण्यात आली होती, जी मंजूर झाली आहे. मात्र या निर्णयालाही स्थानिकांनी विरोध केला आहे. डहाणू पर्यावरण प्राधिकरण मुंबई वरून काम करत असून स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी या प्राधिकरणाचे एक कार्यालय डहाणूमध्ये असावे अशी मागणीही यानिमित्ताने करण्यात येत आहे.
डहाणू विकास आराखड्यात मंजूर रस्त्यामुळे स्थानिकांची दुकाने आणि घरे बाधित होत आहेत. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नागरिकांची मागणी त्यांच्यासमोर मांडणार आहे. – विनोद निकोले, डहाणू विधानसभा आमदार
डहाणू विकास आराखड्यात मंजूर रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण सुरू आहे. दरम्यान काही जमीन मालकांकडून जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध दर्शवून रस्त्याची रुंदी कमी करणे आणि योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात येत आहे. याविषयी तक्रारदारांसह समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. याविषयी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्याची माहिती आमदार निकोले यांनी दिली असून यांच्या सूचनेनुसार सध्या हे काम पुढे ढकलण्यात आले आहे. – अक्षय गुडधे, मुख्याधिकारी डहाणू नगरपरिषद