डहाणू : डहाणू शहरातील चंद्रसागर खाजन (खाडी) परिसरात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आलेला माती भराव आणि कांदळवनांचे नुकसान अखेर दूर करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल विभागाने जेसीबी आणि मनुष्यबळाच्या मदतीने हे बांधकाम हटवले. त्यामुळे या परिसरातील कांदळवनांना नवसंजीवनी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, बेकायदेशीर भराव करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
डहाणूतील चंद्रसागर खाजनात काही लोकांनी आपली मालकी जमीन असल्याचे भासवत बेकायदेशीरपणे माती भराव करून मोठे बांध बांधले होते. यामुळे कांदळवनांचे मोठे नुकसान झाल्याचे आरोप करण्यात आले होते. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या संगीता मंगळया कडू यांनी २०२३ साली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी संगीता कडू यांच्या याचिकेसाठी वकील रामदास हाके पाटील यांनी प्रतिनिधित्व केले. या प्रकरणी न्यायालयाने ३ एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच ९ जूनच्या आदेशात सहा आठवड्यांच्या आत खाडीतील परिस्थिती पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते.
या आदेशानंतर, महसूल विभागाने डहाणूतील १४० आणि मल्याणमधील १८३ सर्व्हे क्रमांकावरील शासकीय जमिनीवर भराव हटवण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला जून महिन्यात पावसाच्या अडथळ्यामुळे काम थांबले होते. मात्र, जुलै महिन्यातील कोरड्या दिवसांमध्ये मनुष्यबळाच्या मदतीने नऊ ठिकाणचे बांध फोडण्यात आले. यामुळे खाडीत निम-खारे पाणी विनाअडथळा येणे शक्य झाले आहे. यामुळे कांदळवनांच्या वाढीसाठी आणि परिसरातील जैवविविधतेसाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्यास मदत होणार आहे.
याप्रकरणी मंडळ अधिकारी डहाणू यांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय जमिनीतील भराव काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून परिसरात काही खाजगी जमीन आहे. त्याठिकाणी पाणी पसरण्याची जागा मोकळी करण्यात आली आहे. याची अधिक माहिती घेण्यासाठी तहसीलदार डहाणू यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
चंद्रसागर खाजन परिसरात काही मालकी जमीन असून या जमिनीमध्ये समुद्राचे पाणी जाऊ नये यासाठी जमीन मालकांनी खाजन क्षेत्रात भराव टाकला होता. यावेळी स्थानिक पातळीवरून मोठी प्रमाणात विरोध होऊन देखील ही काम पूर्ण करण्यात आले होते. या भरावामुळे अनेकदा शहरातील लोकवस्तीत पुराचे पाणी शिरणे आणि शेतीचे नुकसान होण्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या. भरावामुळे पावसाळ्यात पूर परिस्थितीचा धोका वाढला होता. आता भराव हटवल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या भरावासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
समुद्रकिनाऱ्यावरील खाजण जमिनी कोळंबी संवर्धनासाठी उपयुक्त आहेत. परंतु अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत कोळंबी प्रकल्प विकसित झाल्याने खाजण क्षेत्र कमी होत आहे. चंद्रसागर खाजणातील कंक्राडी नदीचे पाणी आणि खाडीचे पाणी एकत्र आल्याने पावसाळ्यात परिसरातील वस्त्यांना धोका निर्माण होतो. या सर्व गोष्टी लक्षात घेता, संगीता कडू यांनी चालवलेला हा पर्यावरणाचा लढा यशस्वी ठरला असून, त्यामुळे चंद्रसागर खाजण आणि परिसरातील कांदळवनांना पुन्हा एकदा भरभराटीची संधी मिळाली आहे. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
चंद्रसागर खाजन परिसरात मोठ्या प्रमाणात मातीभराव करण्यात आला आहे. यामुळे खाजनातील कांदळवनाचे नुकसान झाले आहे. याकडे आम्ही वेळोवेळी शासकीय यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. न्यायालयाच्या आदेशानंतर येथे अंशतः भराव हटवण्याचे काम करण्यात आले आहे. हा फक्त देखावा असून शासकीय यंत्रणेकडून न्यायालयाच्या आदेशाची योग्य अंमलबजावणी न करता फसवणूक होत आहे. खाजनात मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला असून याची सखोल चौकशी होऊन कारवाई होणे अपेक्षित आहे. – संगीता कडू, सामाजिक कार्यकर्त्या