डहाणू : डहाणू येथील कॉटेज रुग्णालय परिसरात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवार २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कॉटेज रुग्णालय परिसरात अशोक पाटील यांचे एक हॉटेल आहे. काल रात्री त्यांची पत्नी धनु पाटील (६५) हॉटेलमध्ये एकट्या होत्या. याच संधीचा फायदा घेत, एक अज्ञात चोरटा ग्राहकाच्या वेशात हॉटेलमध्ये आला. त्याने धनु पाटील यांच्याकडे पाण्याची बाटली मागितली. पाण्याची बाटली देण्यासाठी त्या खाली वाकल्या असता, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी वेगाने खेचली आणि क्षणात पळून गेला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या धनु पाटील यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.

या घटनेनंतर, पीडित महिलेने तात्काळ डहाणू पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, चोरट्याचा शोध सुरू आहे. अशा घटनांमुळे डहाणू शहरातील नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.