डहाणू आगारातून छत्रपती संभाजीनगर प्रवास करणाऱ्या बसचा मंगळवार १ जुलै रोजी सकाळी ९.४५ वाजता कासा जव्हार मार्गावर कवडास येथील तीव्र वळणावर भीषण अपघात झाला आहे. अपघातात १४ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी डहाणू आगारातून सकाळी ८ वाजता निघालेली बस प्रवासात असताना ९.४५ वाजताच्या सुमारास कावडास येथील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडली आहे. अचानक झालेल्या अपघातामुळे बस मधील प्रवाशी गोंधळून गेले असून १४ प्रवासी जखमी झाले आहेत. चालक आणि वाहकांनी प्रवाश्यांना आपत्कालीन मार्गाने बस मधून बाहेर काढले. परिसरातील नागरिकांनी जखमींना तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदतीचा हात दिला.
बस मध्ये एकूण २८ प्रवासी असून यातील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून यातील लक्ष्मी ओझरे (६५) आणि शोभा मेंडगे (६५) हे दोन महिला प्रवासी गंभीर जखमी आहेत. प्रवाश्यांना पुढील प्रवासासाठी दुसरी राखीव बस पाठवण्यात येणार असल्याची माहिती चालक आणि वाहकाकडून देण्यात आली आहे.