संरक्षक कठडे मृत्यूचे सापळे

डहाणू : धोकादायक  वळणे,  तुटलेले संरक्षण कठडे, वाहतुकीच्या सूचनाफलकांचा अभाव आदींमुळे डहाणू -जव्हार महामार्ग धोकादायक बनला आहे. आशागड दरम्यान  सायकल घेऊन शाळेत जाणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना  ताजी असताना  सरावली पूल,  गंजाड  आरोग्य केंद्राच्या जवळचे वळण, वधना पूल, निकणे, आसवे गावाजवळचे वळण, चारोटी नाका ही ठिकाणे मृत्यूचा सापळा बनली आहेत तरी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  डहाणू शहरात सरावली नाका येथील पुलाचे संरक्षक कठडे तुटून पुलाचा एक भाग मोकळा झाला आहे. परिणामी रात्रीच्या सुमारास वाहनचलकाचा अंदाज चुकून वाहन थेट नाल्यात कोसळण्याचा धोका आहे. याबाबत केलेल्या तक्रारीकडे  प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने सरावली पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. डहाणू जव्हार महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. गंजाड  आरोग्य केंद्राच्या जवळचे वळण, वधना पूल, निकणे, आसवे गावाजवळचे वळण, चारोटी नाका ही अपघाताची धोकादायक ठिकाणे आहेत. महामार्गाने पथदिवे नसल्यामुळे रात्री अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. नुकताच गंजाड भागात दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. तर गंजाड पुलाजवळ  वाहन दरीत कोसळण्याचे प्रकार वारंवार होत असून हे अपघात रोखण्यासाठी बांधकाम विभाग व वाहतूक विभागाकडून पुरेसे प्रय होत नाहीत. डहाणू जव्हार रस्त्यावरील जीर्ण पूल, पुलाचे कठडे, धोकादायक वळणे यासाठी स्वतंत्र निविदा काढून काम केले जावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.