पालघर : पालघर शहराच्या पूर्वेकडे सुटणाऱ्या बस सेवा सध्या कार्यरत असणाऱ्या एसटी डेपोमधून सोडण्याचे निश्चित झाले असून पश्चिम भागातील गावांकडे जाणाऱ्या बस स्थानकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या जागेची मागणी राज्य परिवहन मंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निवासस्थान असून या ठिकाणी १८ गुंठे जागा आहे. पालघर शहराचा विकास आराखडा तयार करताना या जागेत शहर बस स्थानक उभारण्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या या निवासी इमारतीला जमीनदोस्त करून त्या ठिकाणी तळमजल्याच्या जागेत बस स्थानक निर्माण करून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यकता भासल्यास त्यांचे कार्यालय किंवा निवासस्थान उभारावे अशी मागणी पुढे येत आहे. त्या अनुषंगाने राज्य परिवहन मंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे या १८ गुंठे जागेची मागणी केली आहे.
पालघर नागरी कृती समितीतर्फे शहरातील विकासासंदर्भात विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मागण्यांपैकी पालघर एसटी स्थानक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत शहर बस स्थानक उभारण्याची एक मागणी आहे. या उपोषणाच्या निमित्ताने राज्य परिवहन मंडळाने पत्रव्यवहार सुरू केल्याचे सांगण्यात येते.