जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सूचना
पालघर: पालघर जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने विकासकामांचे आराखडे पर्यावरणपूरक तयार करावे अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण यांनी जिल्हा परिषद नियोजन समितीच्या आभासी बैठकीत विविध यंत्रणांना दिल्या. ही आभासी बैठक मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, आठ पंचायत समित्यांचे सभापती, गटविकास अधिकारी, सरपंच, अर्थतज्ज्ञ, विविध विषयतज्ज्ञ यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती.
या आभासी बैठकीद्वारे जिल्ह्यातील विकासकामांना मंजुरी दिली गेली. पुढे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर हे आराखडे सादर करून त्यांची अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे. पुढील वर्षांच्या आराखडय़ाला मंजुरी दिली असली तरी ते आराखडे पर्यावरणाला हानी करता कामा नये अशा पद्धतीने कामांचे नियोजन करावे असे बैठकीत सूचित केले गेले. याचबरोबरीने जिल्हा परिषद ग्रामपंचायत व पंचायत समिती यांनी समन्वयाने कामे करून एकच काम दोन वेळा मंजुरीसाठी येता कामा नये याची दक्षता घेण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या. नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत.
