प्रक्रिया किचकट असल्यामुळे काम प्रलंबित

नीरज राऊत

पालघर: समर्पित द्रुतगती मालवाहू मार्गाच्या वाढीव उंचीचे किमान १४ पूल पालघर जिल्ह्यात उभारले जात आहेत. त्यासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे यापैकी अधिकतर पुलांच्या जोडरस्त्याच्या कामी जमीन अधिग्रहणाचे काम प्रलंबित आहे. आदिवासी खातेदारांच्या जमिनी भूसंपादनाची प्रक्रिया ही किचकट असल्यामुळे  प्रशासनाला ती त्रासदायक ठरत आहे. द्रुतगती मालवाहू रेल्वे मार्गासाठी १० मीटर उंचीचे नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारणे आवश्यक असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वसई तालुक्यातील कामण, जुचंद्र व नारंगी, पालघर तालुक्यातील सफाळे, नवली, कोळगाव, वंजारवाडा (बोईसर), डहाणू तालुक्यातील वाणगाव, चिखले व घोलवड, तलासरी तालुक्यातील बोर्डी रोड अशा ११ पुलांचा समावेश आहे. द्रुतगती मालवाहू मार्ग प्राधिकरण अर्थात डीएफसीसीमार्फत उमरोळी, कपासे व पालघर (उत्तर) येथील उड्डाणपुलाचे काम स्वतंत्ररीत्या उभारण्यात येत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या कोळगाव (नवनगर मुख्यालय) लगतचा पूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या पुलाच्या दुतर्फा सिडकोची जमीन असल्याने भूसंपादनाचा प्रश्न उद्भवला नाही. या पुलाची उभारणी मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून या पुलाच्या पूर्वेकडील जोड रस्त्याचे काम प्रलंबित  राहिले आहे. बोईसर वंजारवाडा येथे उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती विस्थापित होण्याची शक्यता पाहता स्थानिक लोकांनी जमिनीच्या पुलासाठीच्या जमीन मोजणीचा विरोध दर्शविला आहे. उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचा विचार करून उड्डाणपूल उभारण्याऐवजी त्यालगतच्या भागातून भुयारी मार्ग उभारण्याची मागणी केली जात असून याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. उर्वरित पुलांच्या जोडरस्त्यांसाठी भूसंपादन प्रलंबित असून वर्ग-२ मधील आदिवासी खातेदार असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रेंगाळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या पुलांकरिता सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पाच उड्डाणपुलाच्या जोड रस्त्यासाठी ५० टक्क्यापेक्षा कमी भूसंपादन झाल्याचे दिसून येत आहे.

केळवे रोड उड्डाणपुलाचा प्रश्न अधांतरीच

केळवे रोड स्थानकाच्या उत्तरेच्या बाजूला चौकीपाडा येथे, तर दक्षिणेच्या बाजूला रोठे येथे भुयारी मार्ग करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व परिसरात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेतला तर भुयारी मार्गामध्ये संपूर्ण पावसाच्या हंगामात पाणी साचून हा मार्ग बंद होईल या भीतीपोटी ग्रामस्थांनी केळवे रोड येथे एक उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. या उड्डाणपुलाच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे प्रशासन तसेच द्रुतगती मालवाहू मार्ग व्यवस्थापनाची संयुक्त पाहणी केली असली तरीही उड्डाणपुलाकरिता अजूनही जागा निश्चित न झाल्याने हा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.

अस्तित्वात असलेल्या सध्याच्या पुलांची उंची आठ मीटर इतकी असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या पूल रेल्वे रुळापासून दहा मीटर उंचीचे करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेच्या दोन रेल्वे रुळ कार्यरत असले तरी विरार- डहाणू दरम्यान चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.  त्यामुळे चौपदरीकरणासाठी ३० ते ३६ मीटर तसेच मालवाहू मार्गासाठी २४ मीटर असे एकंदरीत ५४ ते ६० मीटर रुंदीचे नवीन पूल उभारण्यात येणार आहेत.

डीएससी उभारत असलेले पूल

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रकल्पांतर्गत सफाळे (कपासे), पालघर चार रस्ता- गोठणपूर तसेच उमरोळी पूर्व- पश्चिम भागातील पुलांचा समावेश असून या प्रत्येक पुलाला ५० कोटींच्या जवळपास खर्च अपेक्षित आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दहा पुलांची उभारणी होत असून त्यामध्ये शिलोत्तर (कामण) (वसई) (९३.५५ कोटी), जुचंद्र- बापाने (२८२.६१ कोटी), सफाळे- मांडे-टेंभीखोडावे (६५.९२ कोटी), पालघर- नवली (८६.३० कोटी), कोळगाव- नंडोरे (९६.६२ कोटी), बोईसर- वंजारवाडी (११३.९८ कोटी), वाणगाव (१०३.२४ कोटी), घोलवड चिखले- चिंबावे (८०.१० कोटी), घोलवड कंकराडी कोसबाड- मल्याण (६३७.६४ कोटी), उंबरगाव बोर्डी फाटा-  तलासरी (८२.१९ कोटी) या पुलांचा समावेश आहे.