लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : पालघर जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायतीना आपत्ती प्रतिसाद किट वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडे रवाना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात अथवा नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान ग्रामपंचायत स्तरावर तात्काळ प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने हे आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे संच उपयुक्त ठरणार आहेत.
पालघर जिल्ह्यात ४७३ ग्रामपंचायती असून लक्षणीय लोकवस्तीपैकी समुद्रकिनारी तसेच नदीकिनारी असणाऱ्या ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यामध्ये प्रतिसाद कीटचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये वाडा तालुक्यातील ७४, पालघर तालुक्यातील ६६, डहाणू तालुक्यातील ४९, वसई तालुक्यातील ३२, तलासरी तालुक्यातील १२, जव्हार तालुक्यातील ११, विक्रमगड तालुक्यातील आठ व मोखाडा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आपत्ती व्यवस्थापन किटमध्ये प्रथमोपचार किट, तरंगणारे व घडी घालता येणारे स्ट्रेचर (मोठे व मध्यम आकार), लाईफ जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, गमबुट, हॅण्ड ग्लोज, सेफ्टी नेट, रेपलिंग रोप (३० मीटर) व किट ठेवण्यासाठी बॉक्स या साहित्याचा समावेश असून निवड केलेल्या ग्रामपंचायतीला प्रत्येकी एक बॉक्स देण्यात आलेला आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचेकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर जिल्ह्याकडे २५९ आपत्ती प्रतिसाद किट उपलब्ध झालेल्या आहेत. या किटचा उपयोग आपत्ती घडल्यानंतर शोध व बचाव पथक आपत्ती स्थळी पोहचण्यापूर्वी होणारी जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी, ग्रामीण भागात आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी ही किट संजिवनी ठरणार आहे. -डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी
आपत्ती व्यवस्थापन साहित्याची उपयुक्तता
पालघर जिल्ह्यात तलासरी व डहाणू तालुक्यात भूकंपाचे झटके बसत असून या जिल्ह्यातून वाहणाऱ्या अनेक नद्यांना पावसाळ्यात पूर येण्याचे प्रकार करतात. त्याशिवाय समुद्रकिनारी वसलेल्या गावांना चक्रीवादळाचा फटका बसण्याचे प्रकार देखील घडत असून अशावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राला तसेच जिल्ह्यात स्थित असणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या तुकडीला मदत करण्यासाठी स्थानिक पातळीवरील बचाव कार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्यात निरंतर प्रशिक्षण
जिल्ह्यातील मुख्यालय ठिकाणी एनडीआरएफ ची ४५ सदस्यांची तुकडी गेल्या वर्षभरापासून तैनात ठेवण्यात आली आहे. या तुकडीमार्फत त्यांच्या सदस्यांचे नियमित प्रशिक्षण सुरू असते. याखेरीस पालघर जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, नागरिक तसेच विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण दल (सिव्हिल डिफेन्स) व एनडीआरएफ यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापना दरम्यान शोध व बचाव तसेच प्रथमोपचार याविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. एनडीआरएफ मार्फत वेगवेगळ्या कवायती व मॉक ड्रिलचे आयोजन केले जात असून यामुळे बचावकार्यात सहभागी होण्यासाठी व्यवस्थेतील प्रतिनिधींचे बळकटीकरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ५०० आपदा भरणार
पालघर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या स्वयंसेवकांसाठी ५०० आपदा मित्र भरण्याची योजना असून निवडल्या जाणाऱ्या स्वयंसेवकांना १२ दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून लवकरच माहिती उपलब्ध केली जाणार आहे.