पालघर : शोभवंत मासे पालन आणि मत्स्यबीज निर्मितीसाठी बायोफ्लॉक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे. कमी जागेत आणि कमी भांडवलात मत्स्यपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असून मत्स्यपालकांनी माशांचे खाद्य स्वतः तयार करण्याचे आवाहन केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एन. पी. साहू यांनी मत्स्य शेतकरी दिनाच्या कार्यक्रमात केले.
भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि ग्रामीण रोजगारात मत्स्यपालनाचे योगदान मोठे आहे. याच महत्त्वावर भर देण्यासाठी पालघर जिल्ह्यात केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोसबाड हिल येथे 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एन. पी. साहू, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान आणि त्यातील रोजगाराच्या संधींविषयी जनजागृती करण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. साहू यांनी मत्स्यपालनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ग्रामीण भागातील रोजगाराला बळ मिळते. असे सांगून शेतकऱ्यांना आधुनिक मत्स्यपालनाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मत्स्य संपदा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शेततळ्यातील मत्स्यपालनातून उपजीविका साधता येते आणि त्याचबरोबर शेततळ्यांच्या माध्यमातून जलसंधारणही होते, अशा दुहेरी उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात आधुनिक पद्धतीने मत्स्यपालन करणाऱ्या सहा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तलासरी तालुक्यातील यज्ञेश सावे यांना सर्वोत्कृष्ट मत्स्यपालक म्हणून गौरवण्यात आले. तांत्रिक मार्गदर्शन सत्रात डॉ. कपिल सुखदाणे आणि इतरांनी आधुनिक मत्स्यपालनाविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंका दूर केल्या. विशेष म्हणजे ड्रोनचा वापर करून मत्स्य खाद्य कसे द्यावे याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले, जे शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि उपयुक्त माहिती होती.
या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे पालघर जिल्ह्यात मत्स्यशेतीला चालना देण्याच्या आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.