रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा: गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आज शनिवारी पहाटेपासून रुद्र रुप धारण केले आहे. जिल्ह्यातील सूर्या, पिंजाळी, देहेर्जा, वैतरणा, गारगाई या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. देहेर्जा नदीवरील ब्रामणगांव येथील पुल पाण्याखाली गेल्याने कंचाड- कुंर्झे या मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. गारगाई नदीवरील शिलोत्तर येथील पुल पाण्याखाली गेल्याने पीक- गारगांव या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे.

वाडा- विक्रमगड या दोन तालुक्यांना जोडणारा कंचाड- कुर्झे हा एक महत्त्वाचा जिल्हामार्ग आहे. या मार्गावर देहेर्जा नदीवर ब्राम्हणगांव- कुंर्झे या दोन गावांच्या दरम्यान पुल आहे. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीत नेहेमीच हा पुल पाण्याखाली जातो. काही वेळा या भागातील नागरीकांचा चार, चार दिवस तालुक्यांशी संपर्क तुटतो. या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर शेलार यांनी पालघरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. गारगाई नदीला आलेल्या महापुरात शिलोत्तर येथील पुल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील बससेवा व अन्य वाहतूक ठप्प झाली आहे.

आणखी वाचा-अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळी दहा वाजेपर्यंत हा पुल पाण्याखाली गेलेला नव्हता, त्यामुळे आंबेपाडा, चिंचपाडा येथील विद्यार्थी, एसटी बसने तालुका मुख्यालयी असलेल्या शाळा, महाविद्यालयात गेले होते. मात्र सकाळी ११ वाजेनंतर हा पुल पाण्याखाली गेला. दुपारी दोन वाजेपर्यंत नदीचा पूर कायम राहिल्याने व पाण्याखालीच राहिल्याने येथील विद्यार्थी, नागरिक व शेकडो वाहने यांना ५ ते ६ तास नदीकाठी ताटकळत रहावे लागले होते.