उटावली गटातील तेरा बालकांचे पालकत्व स्वीकारले

पालघर : पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या कुपोषित बालकांच्या आहारावर व आरोग्यावर लक्ष राहावे यासाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेली दत्तक पालकत्व योजना प्रभावी ठरणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या गटातील कुपोषित बालकांवर देखरेख ठेवायची आहे व कुपोषण निर्मूलनासाठी त्यांचे पालकत्व स्वीकारायचे आहे. विक्रमगड तालुक्यातील उटावली जिल्हा परिषद गटातून सदस्य संदेश ढोणे यांनी याच योजनेअंतर्गत तेरा कुपोषित बालके दत्तक घेऊन या योजनेचा शुभारंभ केला. विविध स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांना एकत्रित आणून या योजनेअंतर्गत प्राथमिक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. विक्रमगड पंचायत समितीचा सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाद्वारे उटावली गटातील १३ तर दादडे गटातील १४ अशा एकूण २७ कुपोषित बालकांच्या पालकांमध्ये जनजागृती करून त्यांना कुपोषण निर्मूलनाचे मार्गदर्शन केले गेले. महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत हे मार्गदर्शन केले.

कुपोषित बालकांची वजन, उंची, त्यांना अंगणवाडीतून व इतर ठिकाणाहून दिला जाणारा पोषण आहार त्याचबरोबरीने त्यांच्या आरोग्यासंबंधी सुरू असलेले औषधोपचार यावर देखरेख ठेवण्याचे काम जिल्हा परिषद सदस्य पालकत्व योजनेद्वारे करणार आहेत. कुपोषित बालकांना कुपोषणाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी सदस्य वर्ग पालक म्हणून जबाबदारी स्वीकारत आहेत. तसेच कुपोषण होऊ नये यासाठी जनजागृती, बालकांना प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यकक्षेत आणणे अशी कामे या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेत निवडून गेलेले लोकप्रतिनिधी करणार आहेत. कुपोषित बालके व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठीही पालकत्व योजना प्रभावी ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचा आहे.

पालकत्व योजनेची संकल्पना

जिल्हा परिषदेच्या अधिकारी वर्गाने याआधी कुपोषित बालकांचे पालकत्व स्वीकारले होते. त्या वेळी अधिकारी व कुपोषित बालकांचे पालक यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. लोकप्रतिनिधी हे थेट जनतेतून निवडून आल्याने त्यांचा स्थानिक स्तरावर जनसंपर्क व समन्वय चांगला असतो. त्यांनी त्यांच्या गटात कुपोषित बालकांचे पालकत्व स्वीकारल्यास पालकत्व योजना प्रभावी ठरेल व कुपोषण निर्मूलनास मदत होईल हे लक्षात घेत हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पालकत्व योजनेची संकल्पना पुढे आणली.

जिल्हा परिषद सर्व यंत्रणांच्या समन्वयाने जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात अल्पवयीन माता, दोन मुलांच्या जन्मामध्ये कमी अंतर असणे ही कुपोषणवाढीतील मुख्य कारणे आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.

संदेश ढोणे, सदस्य, जि. प. पालघर