पालघर : गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेला स्थानिक कंत्राटी शिक्षक भरतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या निर्णयामुळे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. स्थानिक शिक्षकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाल्याने शिक्षणाच्या दर्जात वाढ होणार असल्याने पालघर जिल्ह्यात शिक्षक भरतीचा उत्साह दिसून येत आहे.
वर्षभरापासून प्रलंबित असलेला स्थानिक कंत्राटी शिक्षक भरतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या भरती प्रक्रियेमुळे स्थानिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी मधील भाषा, समाजशास्त्र, विज्ञान, गणित हे विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती करण्यात आली असून शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ही भरती केवळ रोजगाराची संधी नाही, तर शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्थानिक शिक्षक स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे समजावून सांगू शकतात. अशा भावना लोकप्रतिनिधी यांनी व्यक्त केल्या आहेत. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली असून या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी यांचे विशेष योगदान राहिले असल्याचे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले आहे. विशेषतः पहिली ते पाचवीसाठी गणित, भाषा आणि समाजशास्त्र या विषयांवर शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती झाल्याने प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
या यशस्वी भरती प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि नियमानुसार राबवण्यात आली. त्यामुळे स्थानिक शिक्षक आणि पालक वर्गामध्ये प्रशासनाविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शिक्षण विभाग प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांचे अभिनंदन केले आहे.
शिक्षकांना ठाणे जिल्ह्यात पाठवणार…
भरती प्रक्रियेनंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यातून पालघर येथे कार्यरत असलेल्या विकल्प विपरीत शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मूळ जिल्ह्यात म्हणजेच ठाणे जिल्हा परिषदेमध्ये कार्यमुक्त करून परत पाठवण्यात आले आहे. २०१४ पासून पालघर येथे कार्यरत असलेल्या शिक्षकांना या भरती मुळे ठाणे जिल्ह्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे, या निर्णयामुळे संबंधित शिक्षकांनाही दिलासा मिळाला असून त्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.