डहाणू : मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण घाट, धानीवरी तसेच डोंगरउतारावर ठिकठिकाणी महामार्गावर दरड कोसळून धोकादायक वळणांवर अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे या दरडी कोसळून होणारी हानी रोखण्यासाठी घाटात संरक्षक भिंत किंवा उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर धानीवरी, मेंढवण, ढेकाळे खिंडीत तर अनेक भागात डोंगर कपारीतून मोठमोठाले दगड निखळून महामार्गावर कोसळण्याच्या बेतात आहेत. पहिल्याच पावसात मेंढवण घाटात मोठे दगड निखळून महामार्गावर आले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती आणि डागडुजीसाठी आयआरबी कंपनीला ठेका दिला होता. त्याचा कालावधी आता संपला आहे. सध्या तीन महिन्यांसाठी अन्य ठेकेदार कंपनीकडून टोल वसुलीचं काम सुरू आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच तात्पुरता ठेका असलेल्या कंपनीकडून महामार्गाची निगा राखणे आणि पावसाळय़ाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवन, धानीवारी, ढेकाळे आणि खानिवडे या तीन घाटांदरम्यान तीव्र स्वरूपाची मोठमोठी नागमोडी वळणे असल्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी हायवेवेरील डेंजर झोनमधील दरड नियंत्रणासाठी संबंधित प्राधिकरणाने विभागामार्फत तातडीची उपाययोजना म्हणून मोहीम तातडीने हाती घेणे गरजेचे आहे.

मृत्यूचा सापळा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही नियम, शर्ती आणि अटी लावल्या असल्या तरी त्याचे पालन मात्र केले जात नाही. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर ढिगारे, अर्धवट कामे तशीच आहेत. अनेक ठिकाणी महामार्गावर दरडी कोसळण्याच्या बेतात आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा महामार्ग म्हणजे जणू मृत्यूचा सापळा बनलेला आहे. शिवाय रस्त्यांवरील खड्डे चुकविताना वाहनचालकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनला आहे.