पालघर : गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर गणेशकुंड, नवली तलाव तसेच विसर्जन घाटावरून जवळपास साडे पाच टन निर्माल्य नगर परिषदेकडून संकलित करण्यात आले आहे. या निर्मल्यातून प्लॅस्टिक व इतर कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील १५ दिवसात यातून खत निर्मिती होणार आहे.
शनिवारी रात्री उशिरा संपन्न झालेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर विसर्जन घाट, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे परिसर, विसर्जन मिरवणुकांचे मार्ग या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. विसर्जनानंतर पाण्यातील निर्माल्य तसेच निर्माल्य कलश मधील निर्मल्य जमा करून ते साठविण्यात आले. विसर्जन स्थळांवर जमा झालेल्या साडे पाच टन निर्माल्यपासून पर्यावरणाच्या दृष्टीने सेंद्रिय खत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. निर्माल्याचे संकलन करण्यासाठी विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश उभारण्यात आले होते.
पालघर रेल्वे स्थानकापासून हुतात्मा चौक, कचेरी रोड, जुना मनोर रोड व पुढे गणेशकुंडाकडे जाणाऱ्या मार्गांवर फटाके, पताके तसेच इतर सजावटींच्या कागदांचे तुकडे यासह पाण्याच्या बॉटल, खाद्यपदार्थांच्या प्लेट, ग्लास असा अनेक कचरा पडला होता. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी भेट देत स्वच्छता विषयक कार्यवाहीचा आढावा घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला.
कृत्रीम तलाव व विसर्जन स्रोतातून निघणारे निर्माल्य यांचे पावित्र्य राखून खत निर्मितीसाठी पाठविले आहे. या निर्माल्यापासून तयार झालेले सेंद्रिय खत नगरपरिषद क्षेत्रातील उद्यानांमध्ये वापरण्यात येणार असून इतर नागरिकांना हे खत हवे असल्यास पाच रुपये किलो दराने नगरपरिषद येथून घेऊन जाण्याचे आवाहन मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी केले आहे.
निर्माल्यापासून खत निर्मिती
निर्माल्य नगर परिषद कार्यालयाच्या मागील जागेत खत निर्मितीसाठी ठेवण्यात आला आहे. यामध्ये असलेले प्लास्टिक हार, पिशव्या तसेच हारामध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिक चेंडू व इतर अविघटनशील पदार्थ वेगळे करण्याचे प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर या निर्माल्य मधील केळीचे पान, फुलं यावर बायो कल्चर हे पावडर टाकून खत निर्मितीच्या प्रक्रियेसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच दीड अडीच दिवसाच्या गणपतीच्या वेळी जमा झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती प्रक्रिया सुरू झाली असून पुढील काही दिवसात हे खत वापरण्यासाठी उपयोगी ठरणार.