पालघर: करोनाचे प्रमाण देशात अनेक ठिकाणी वाढत असताना जिल्ह्यात विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे. अनेक विद्यार्थ्यांना गेल्या दीड-दोन महिन्यांत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा तापाने आजारी पडल्याचे प्रकार घडले आहेत. विद्यार्थ्यांमधील आजाराचा प्रसार शीघ्रपणे मोठय़ा प्रमाणात होत असून त्यामध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यात दुसरीकडे करोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत असून ग्रामीण जिल्ह्यातील ३९ रुग्णांसह जिल्ह्यात २७४ करोनाबाधित रुग्ण आहेत. त्याखेरीज अनेक नागरिकांना करोनासारख्या आजाराची लक्षणे असली तरी बहुतांश संशयित रुग्ण तपासणी करीत नसल्याचे दिसून आले आहे. श्रावणातील सणासुदीच्या निमित्ताने तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमांमध्ये गर्दी होत असल्याने करोना आजाराचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात करोना रुग्णांना दाखल करण्यासाठी शासकीय व्यवस्था कार्यान्वित नसल्याचे सांगण्यात येते.

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, कंबरदुखी, अति प्रमाणात थकवा अशी लक्षणे असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक प्रभावित झाले असून यंदाच्या वर्षांत जिल्ह्यात आतापर्यंत डेंगूचे ६१, चिकनगुनियाचे ११, तर मलेरियाचे ४१ रुग्ण आढळले असून सध्याचे वातावरण डास पैदाससाठी अनुकूल असल्याने या आजारांचे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

तीन ते पंधरा वर्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये वारंवार ताप येण्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांना आला असून त्यांच्यामध्ये करोना किंवा स्वाइन फ्लूची लागण असल्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.

स्वाइन फ्लूच्या गंभीर रुग्णाची तपासणी करण्यासाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वायरलॉजी (राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था) येथे रक्त नमुने पाठवावे लागत असून डहाणू येथील आयसीएमआर केंद्रामध्ये स्वाइन फ्लूची तपासणी करण्यासाठी शासनाकडून तपासणी संच (किट)ची मागणी करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूच्या खासगी तपासणी महागडी असून या आजाराच्या उपचारासाठी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात टॅमीफ्लू व इतर औषधसाठा उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, डास पैदास ठिकाणे नष्ट करणे, आजारी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याची खबरदारी घ्यायला हवी, असे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींकडून सांगण्यात येत आहे.