डहाणू: मागील तीन वर्षांपासून बंद असलेल्या दाभोण आरोग्यवर्धिनी पथकाला अखेर कर्मचारी मिळालेले आहेत. वाणगावजवळील दाभोण येथील दुर्गम भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी नेमलेले हे आरोग्यवर्धिनी पथक कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी नेमून नुकतेच कार्यान्वित करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारीच नसल्याने दाभोण आरोग्यवर्धिनी पथक गेली तीन वर्षे बंद पडले होते. त्यामुळे वैद्यकीय सेवा सुविधा मिळवण्यासाठी दुर्गम भागातील ग्रामस्थांची अडचण होत होती. हे पथक बंद असल्याने साये, उर्से, ऐणा, दाभोण, रणकोल, शेलटी, सारणी, आंबोली, म्हसाड, निकवली, आंबीस्ते, निकने, पिंपळशेत, साखरे, आदी गावातील रुग्णांना आरोग्याच्या तक्रारींसाठी वाणगाव, कासा येथे जावे लागत होते. मात्र जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या पाठपुराव्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी गाडेकर यांनी दाभोण येथे जाऊन तत्काळ चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केले आहे. 

डहाणू तालुक्यातील साये, उर्से, ऐणा, दाभोण, रणकोल, शेलटी, सारणी, आंबोली, म्हसाड, निकवली, आंबीस्ते, निकने, पिंपळशेत, साखरे, आदी गावांमध्ये वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी हे पथक काम करते. यावेळी जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे  पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.