पालघर : पालघर जिल्ह्याच्या वनपरीक्षेत्र मनोर अंतर्गत मौजे नांदगाव गावाच्या हद्दीत खैर तस्करीचा एक मोठा डाव वनविभागाच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी उधळून लावला आहे. यामध्ये लाखो रुपये किमतीची २८ खैर ओंडके जप्त करण्यात आले आहेत. मनोर अंतर्गत येणाऱ्या मौजे नांदगाव वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खैरांची लागवड केलेली आहे. २६ जुलै रोजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

वनरक्षक राजेश खांड्रा (नांदगाव), वनरक्षक जितेश भरसट (कोसबाड), साईनाथ कुवर, तेजस सुतार, रोशन धांगडा व हरी वरठा यांच्यासह त्यांच्या सहकारी मित्रांनी मोठ्या सतर्कतेने ही कारवाई यशस्वी केली. चोरट्यांचा खैर तस्करीचा प्रयत्न त्यांच्या जागरूकतेमुळे हाणून पाडण्यात आला.

वनविभागाच्या पथकाने मध्यरात्री केलेल्या कारवाईत सुमारे २८ खैर ओंडके (लाखोंची किंमत) जप्त केली आहेत. चोरट्यांनी बेकायदेशीरपणे तोडलेला हा खैर माल नेटाळी डेपो, मनोर येथे सुरक्षितरित्या हलवण्यात आला आहे. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील वनसंपदा संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाची सक्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. खैर हा अत्यंत मौल्यवान वृक्ष असून, त्याच्या लाकडाचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये होतो. त्यामुळे खैर तस्करीचे प्रमाण जास्त असते आणि अशा घटनांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर जिल्ह्यातील खैर तस्करीचा पूर्वेतिहास

पालघर जिल्हा हा वनसंपदेने समृद्ध असल्यामुळे येथे खैर तस्करीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. वनविभाग सातत्याने अशा घटनांवर लक्ष ठेवून आहे आणि अनेकदा यशस्वीरित्या कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जानेवारी 2024 मध्ये खैर तस्करीचा एक मोठा प्रकार उघडकीस आला होता. वनविभागाने कारवाई करत लाखो रुपयांचा खैर जप्त केला होता. विक्रमगड परिसरातही खैर तस्करीचा प्रयत्न सप्टेंबर 2023 मध्ये वनविभागाच्या पथकाने हाणून पाडला होता. या घटनेत काही आरोपींना अटकही करण्यात आली होती. तर मे २०२२ तलासरी तालुक्यातील वनक्षेत्रातून खैर तोडून नेण्याचा प्रयत्न वनकर्मचाऱ्यांनी हाणून पाडला होता. या घटनांवरून हे स्पष्ट होते की पालघर जिल्ह्यात खैर तस्करी ही एक गंभीर समस्या आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी वनविभाग, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वयाची आणि सतर्कतेची आवश्यकता आहे.