पालघर: पालघर व २६ गावच्या नळ पाणी योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अनेक गावांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आखलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या पडघे व १९ गावच्या योजनेला अंतर्भूत करण्यासाठी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी अनुमती देऊन परवानगी देण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र असे झाल्यास पालघर शहरातील नागरिकांवर अन्याय होईल तसेच पालघर शहराला इतर १९ गावांच्या पाण्याच्या पंपिंग व शुद्धीकरणाच्या खर्चाचा बोजा उचलावा लागेल या कारणावरून या जोडणीला विरोध करत पालघरच्या नगरसेवकांनी ही काम थांबविले. पालघर परिसरातील गावांमध्ये होणाऱ्या मोठमोठ्या गृहसंकुलाला पाणी देण्याचा छुपा डाव पालघरच्या नगरसेवकांनी हाणून पाडला असून शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांना स्वपक्षीयांकडून घरचा अहेर मिळाला आहे.
पालघर व २६ गावांची नळपाणी योजना जुन २००९ मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर सन २०११ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही योजना पालघर नगर परिषदेकडे हस्तांतरित केली होती. तेव्हापासून या योजनेतील जल शुद्धीकरण, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व रसायन खर्च, देखभाल – दुरुस्ती व पाण्याच्या पंपिंग साठी लागणारा विद्युत खर्च नगरपरिषद करत आहे. यासंदर्भात आरंभी झालेल्या योजनेत पालघर नगर परिषदेने ७३.०८ टक्के तर उर्वरित गावांनी २६.९२ टक्के खर्च उचलण्याबाबत समझोता झाला होता. मात्र वेगवेगळ्या गावांकडून जिल्हा परिषदेमार्फत पालघरला नळ पाणी योजने करिता निधी प्राप्त होत नसल्याने पालघर शहर व उर्वरित गावांमध्ये पाण्याचा प्रश्न काही वर्षांपासून पेटला होता.
आपल्या गावाला पाणी मिळत नाही म्हणून पाणीपट्टी वसुली होत नाही व त्यामुळे आम्ही पाण्याची देयके देऊ शकत नाही अशी भूमिका वारंवार घेतली जात असल्याने पालघर नगर परिषदेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून वेगवेगळ्या गावांना पाणी वितरणावर मोजमाप ठेवणारे यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे या गावांनी त्यावर पळवाट करण्याच्या दृष्टीने जलजीवन योजने अंतर्गत पडघे व १९ गावांसाठी स्वतंत्र योजनेची आखणी केली. या योजनेला पाण्याचे स्त्रोत म्हणून पालघर नळपाणी योजनेतील शेलवाली येथील शुद्धीकरण प्रकल्पाच्या बैठ्या साठवणूक टाकीमधून जोडणी देण्यात प्रस्तावित करण्यात आले होते. या कृतीला पालघर नगर परिषदेने वारंवार विरोध करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सूर्या नदीतील पाणी स्त्रोत्रापासून स्वतंत्र योजना आखावी अशी मागणी केली होती.
मात्र जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यानी काही ठेकेदार व अधिकाऱ्यांशी संगनमत करून पालघर व २६ गावाच्या नळ पाणी योजनेतील शुद्धीकरण प्रकल्पातून टॅपिंग घेण्याचे योजिले होते. पालघर परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायटी उभ्या राहत असून त्यांना छुप्या मार्गाने सहज पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या एका बैठकीत आमदार राजेंद्र गावित यांनी पालघर नळपाळी योजनेतून नव्याने कार्यान्वित होणाऱ्या योजनेला जोडणी देण्यासंदर्भात तोंडी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पालघरच्या मुख्य अधिकारी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आज (ता २३) रोजी शुद्धीकरण प्रकल्पातील बैठ्या साठवणूक टाकीमधून पाईपलाईन जोडणे (टॅपिंग) करण्याची सूचित केले होते.
याबाबतची माहिती पालघरच्या माजी नगरसेवकांना मिळाल्यानंतर माजी नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत, माजी नगरसेवक अमोल पाटील, चंद्रशेखर वडे, तुषार भानुशाली, अक्षय संखे व सहकाऱ्यांनी शेलवाली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे येथे आमदार राजेंद्र गावित यांचे आदेश धुडकावून काम बंद पाडले. पालघर नगरपरिषदेला नळपाणी योजना चालवण्यासाठी दर महिन्याला सुमारे सव्वा सहा कोटी रुपयांचा खर्च येत असताना या योजनेतील इतर गावांकडून पाणी वापरा संदर्भात कोणत्याही प्रकारचे भरीव योगदान मिळत नसल्याचे पत्रकारांसमोर नमूद केले. शिवाय पालघर जवळील इतर गावांमध्ये सुरू असणाऱ्या नामांकित गृह संकुलांना पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नाबद्दल तसेच आमदार राजेंद्र गावित यांनी पालघरवासी यांच्याविरुद्ध घेतलेल्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी पत्रकारांसमोर व्यक्त केली.
पालघर शहरातील अनेक भागांमध्ये आजही पाणी उपलब्ध होत नसताना ३.९० एमएलडी क्षमतेची पाणी योजना पालघर शहरासाठी अस्तित्वात असणाऱ्या योजने मधून कार्यान्वित केल्यास शहरातील मोठा भाग तहानलेला राहील याकडे आमदार त्यांचे लक्ष वेधले. स्व:पक्षीय माजी नगरसेवक व पदाधिकारी यांची भूमिका पाहून आमदार गावित यांनी आपली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याचे सांगत या संदर्भात सोमवारी संयुक्त बैठकीचे आयोजन करून निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका बदलली.
दरम्यान पालघर व २६ गावच्या नळ पाणी योजना अतिरिक्त पाण्याची मंजुरी नाही, ही योजना चालवण्यासाठी सुधारित नियोजन प्राप्त नाही तसेच पडघे व १९ गावांच्या नळ पाणी योजनेत जलवाहिनी चे काम पूर्ण झाल्याचे अहवाल प्राप्त नाही असे सांगून पालघरच्या मुख्याधिकारी यांनी आज हे काम थांबवण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व यापूर्वी पाईपलाईन जोडणी संदर्भात दिलेली परवानगी राखून ठेवली.
यामुळे पालघर शहर व जिल्हा मुख्यालयासाठी अस्तित्वात असलेल्या नळ पाणी योजनेत उर्वरित गावांचा समावेश केल्यास सूर्या नदीतून पाण्याचे पंपिंग करून त्याची शुद्धीकरण करण्यापर्यंतचा खर्च फक्त पालघर नगर परिषदेने उचलायचा का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालघर शहरात देखील पाण्याचा प्रश्न पेटणार आहे. एकीकडे पालघर शहरातील नागरिक वाढीव दराने पाणी बिल भरत असताना या योजनेतील इतर गावाला अत्यल्प दराने पाणीपुरवठा केला जातो. पालघर शहरातील वाटणारी लोकसंख्या व येथील लोकांवर मिळणाऱ्या कमी प्रमाणात महागडे पाणी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालघर तालुक्यातील पाणी प्रश्नावर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा आजी- माजी लोकप्रतिनिधी मधला वाद पेटला आहे.
कोट:
एम जी पीच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून पालघर दर पाणी योजनेत मुबलक (अतिरिक्त) पाणी उपलब्ध असल्याचे भासविल्यामुळे पडघे व १९ गावाच्या नळपाळी योजनेला जोडणी देण्याबाबत आपण सूचित केले होते. पालघरच्या माजी नगरसेवकांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर यासंदर्भात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल. मी पालघर शहरवासीयांच्या विरुद्ध नसलो तरी इतर गावातील नागरिक देखील आपले मतदार असल्याने सर्वांचा विचार करीत आहे. – राजेंद्र गावित, आमदार