समाजोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्याची गिर्यारोहक, निसर्ग भटकंती करणाऱ्या समूहाची संकल्पना

पालघर: दुर्गम भागातील गरजूसाठी एक स्तुत्य उपक्रम गिर्यारोहकांच्या व निसर्ग भटकंती करणाऱ्या एका समूहाने (अ‍ॅडव्हेंचर्स लव्हर्स ग्रुप) हाती घेतला आहे. ‘मोफत मॉल’ संकल्पनेअंतर्गत पालघर जिल्ह्यतील आदिवासी पट्टय़ात वापरण्यायोग्य कपडय़ांसह लहान मुलांची खेळणी, पादत्राणे, भांडी, शालोपयोगी साहित्य, घरातील काही वस्तू आदी मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मोफत मॉल या उपक्रमांतर्गत दुकानरूपी मंडप टाकून त्यातून गरजूना हवे ते मोफत घेऊन जाण्याची ही संकल्पना आहे. ३० जणांचा समूह या उपक्रमांतर्गत काम करत आहे. मोकळ्या मैदानावर हजार चौरस फुटात हा मॉल उभारला जातो. या मॉलमध्ये कूपन प्रणालीद्वारे गरजूंना १० वस्तू मोफत घेण्याची मुभा देण्यात येते. मॉलमध्ये पुरुष, ष्टिद्धr(२२९या आणि मुलांसाठीच्या कपडय़ांपासून ते पादत्राणे ते अगदी खेळणी आणि इमिटेशन ज्वेलरी आदी वस्तू ठेवण्यात येतात. वेगळवेगळ्या दुर्गम भागात एका दिवसापूरताच हा मॉल असतो.

पालघर जिल्ह्यतील दुर्गम भागांत भटकंती व गिर्यारोहण करताना तेथील हलाखीत जगणाऱ्या कुटुंबाची स्थिती लक्षात घेत त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे, अशी सामाजिक भावना निर्माण झाल्यानंतर  या समूहाने या संकल्पनेतून आपले उद्दिष्ट साध्य करायला सुरुवात केली. मुंबई आणि आजूबाजूच्या विविध ठिकाणांहून तसेच समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करून नागरिकांना कपडे व इतर गोष्टी देण्याचे आवाहन सदस्य करतात. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून हजारो जणांनी वास्तुरूपी दान आजवर केले आहे. कपडे, स्टेशनरी, खेळणी, पादत्राणे, शालोपयोगी, घरातील काही सामान इत्यादी बाबी गोळा केल्यावर त्यातील वापरण्यायोग्य वस्तू वेगळ्या करुन मोफत मॉलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या जातात.

दरम्यान,  गरजू नागरिकांना मोफत मॉलच्या माध्यमातून खरेदीची अनुभूती देण्याचा आमचा मूळ उद्देश आहे. त्यांच्यासाठी सर्व वस्तू मोफत आहेतच. मात्र त्यांना मोफत मिळाल्याची सल वाटू नये तसेच ग्रामीण गरजू नागरिकांना शहरी मॉलच्या खरेदीसारखा आनंद लुटता यावा यासाठी आमची धडपड आहे.

गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम आम्ही अविरत करत आहोत यातून गरजूंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटत आहे असे अ‍ॅडव्हेंचर्स लव्हर्स ग्रुपचे  सलमान रंगवाला यांनी सांगितले. 

दुर्वेस गावात दीड हजार ग्रामस्थांना लाभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्वेस गावात कातकरी पाडा येथे रविवारी मैदानावर सुमारे ९०० चौरस फूट आकाराचा एक तंबू म्हणजे मॉल उभारला गेला. जवळपास दीड हजार आदिवासी वस्त्यांमधील ग्रामस्थांनी शिबिराला भेट दिली. कूपन प्रणालीद्वारे येथे भेट देणाऱ्या प्रत्येक गरजूला आवश्यक असलेल्या १० वस्तू मोफत देण्यात आल्या. वस्तू मिळताच गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असताना दिसत होता. एका वृद्ध महिलेने तर आवडते कपडे उचलले असता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून या उपक्रमाचे फलित झाल्याचे समाधान समूह सदस्यांनी व्यक्त केले. विशाल गायकर यांनी गर्दीचे व्यवस्थापन केले होते. ग्रामपंचायतीच्या परवानगीने हा मॉल एक दिवसासाठी लावला होता. त्यातून नागरिकांना मिळालेली मदत पाहून या समूहाचे कौतुकही करण्यात आले.