पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच अकरावीच्या प्रवेशाकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिये बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण झालेले जवळपास ६० हजार विद्यार्थ्यांकरिता १७८ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.
शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, पालघर जिल्हा परिषदेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २१ मे पासून सुरु होणार असल्याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर आता अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. तर ही प्रक्रिया ३ जून च्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वसई तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अर्ज भरणे व त्याबाबतच्या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अर्ज प्रक्रिया कशी करावी याबाबत अनेक ठिकाणी चौकशी करून विद्यार्थी अर्जाची प्रक्रिया समजून घेत आहे. मात्र ग्रामीण भागात नेटवर्क अभावी ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल का याबाबत पालकांमध्ये व शिक्षण विभागामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवेश प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षमपणे राबवण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न आहेत. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात सुलभता प्रदान करणे आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी https://mahafyjcadmissions.in या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी शिक्षण विभागाच्या अधिकृत ई-मेलद्वारे संपर्क साधता येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अशी चालणार प्रक्रिया
शासनाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार २६ ते ३ पर्यंत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया नोंदणी, ५ जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर, ६ व ७ जून रोजी विद्यार्थी हरकती दाखल करू शकतात, ८ जून रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध, ९ ते ११ जून दरम्यान शून्य फेरी प्रवेश व कॅप फेरी प्रवेश, ११ ते १८ जून दरम्यान सर्वांसाठी खुली फेरी व २० जून रोजी फेरी क्रमांक दोन साठी रिक्त जागेच्या यादी जाहीर करण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर मॉडेल अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर नोडल तसेच सहायक नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर एक नोडल आणि एक सहायक नोडल अधिकारी तसेच पालघर, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, वाडा, वसई आणि डहाणू तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक नोडल आणि सहायक नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. हे अधिकारी शाळा आणि ज्युनियर कॉलेजांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतील.
ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आणि पारदर्शक आहे. नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रक्रिया सुसूत्र आणि गतिमान होईल. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. – मनोज रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी