पालघर : पालघर जिल्हयातील अतिवृष्टीमुळे रस्त्यांवरील पुल पुराच्या पाण्याखाली जातात व त्यामुळे संपर्क तुटण्याच्या घटना घडत असल्यामुळे पुराच्या पाण्याखाली जाणारे पुल व रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या सूचनेनुसार पालघर जिल्हयातील सर्व तालुक्यांतील पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची माहिती तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेतील तफावत दूर करण्यासाठी धरती आबा अभियान राबविण्यात येत असून त्याबाबतचा पूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद, पालघर यांनी सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे जिल्हयातील पुराच्या पाण्यामुळे बुडणारे पालघर तालुक्यातील चार, वसई पाच, डहाणू २४, तलासरी चार, वाडा १८, विक्रमगड १३, जव्हार १४, मोखाडा तीन असे एकूण ८५ पुल व रस्ते आहेत.
पूररेषेच्या पातळीनुसार पुल दुरुस्ती अथवा उंची वाढविणे किंवा आवश्यक उपाययोजना करण्याकामी नमूद पुलाचे अंदाजपत्रक १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर, जव्हार व कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद पालघर यांना देण्यात आलेले आहेत.
या प्रस्तावित कामांपैकी आदिवासी क्षेत्रातील कामे आदिवासी उपाय योजना मधून व बिगर आदिवासी क्षेत्रातील कामे ही जिल्हा नियोजन समिती व विभागाच्या इतर योजनेतून पुढील दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष भागडे यांनी कळविले आहे.