डहाणू : तालुक्यातील विवळवेढे येथील प्रसिद्ध महालक्ष्मी जत्रेनंतर गावामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायत मार्फत कचरा व्यवस्थापन करण्यात उदासीनता दाखवण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. १२ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत सुरू असलेला जत्रा उत्सव संपल्यानंतर ग्रामपंचायत मार्फत कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे असून अनियोजित कारभारामुळे गावकऱ्यांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.
महालक्ष्मी जत्रेमध्ये शेकडो दुकानदारांनी आपली दुकाने थाटली असून जत्रेच्या शेवटी परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तयार झाले असून यामध्ये प्लास्टिक, कुजलेले अन्न, कांदा लसूणचे आवरण, कुजलेल्या भाज्या आणि इतर कचरा गोळा झाला आहे. याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असून जत्रा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत कडून मोठ्या प्रमाणात जत्रा कर वसूल केल्याची माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे. असे असून देखील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत उदासीन भूमिका घेतली जात असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक दुकानानुसार दुकानदारांकडून १००० ते २५०० रुपये पर्यंत कर वसूल करण्यात आला आहे. जत्रेच्या सुरुवातीला ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणारा नाहरकत दाखला घेताना ग्रामपंचायत कडून कर वसूल करण्यात आला आहे. मात्र जत्रेमध्ये ग्रामपंचायत मार्फत दररोज झाड लोट करण्याशिवाय कोणत्याही आवश्यक उपययोजना करण्यात आल्या नसल्याचे आरोप करण्यात येत आहेत. शिवाय जत्रा संपल्यानंतर देखील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे ग्रामपंचायतचे कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
महालक्ष्मी जत्रेमध्ये शेकडो दुकाने थाटली जातात. जत्रेमध्ये गर्दीच्या दिवशी कचरा गोळा करण्यासाठी वाहन घेऊन जाणे कठीण होत असल्यामुळे छोट्या काचरागाडीने कचरा उचलला जातो. मात्र जत्रा संपल्यानंतर दुकाने निघून गेल्यावर ग्रामपंचायत मार्फत कचरा व्यवस्थापन करण्यात उदासीनता दिसून येत आहे. सध्या गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग झाले असून मोकाट जनावरे कचरा उकरात असल्यामुळे माश्या वाढत असून रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महालक्ष्मी जत्रेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत मार्फत मोठ्या प्रमाणात कर वसुली करून देखील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या जवळजवळ ८० टक्के दुकाने निघून गेली असून देखील कचरा व्यवस्थापन करण्यात आलेले नाही. यामुळे कचऱ्याच्या ढीगांवर मोकाट जनावरे आणि माश्या आल्या असून यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. – योगेश गेरय्या, सामाजिक कार्यकर्ते
जत्रा संपली असली तरी अद्याप जत्रेत काही दुकाने राहिली आहेत. सर्व दुकाने उठल्यानंतर आम्हाला कचरा व्यवस्थापन करण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत. दुकाने उठल्यावर आम्ही तत्काळ स्वच्छता करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आहोत. – एस. दांडेकर, ग्रामविकास अधिकारी ग्रुपग्रामपंचायत विवळवेढे