आकडेवारी आणि प्रत्यक्षातील कचऱ्यामध्ये तफावत; निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप
निखील मेस्त्री
पालघर: ‘स्वच्छ पालघर, सुंदर पालघर‘ चा नारा देणाऱ्या पालघर नगर परिषद हद्दीत दररोज दहा टन ओला कचरा गोळा होत असताना गेल्या चार वर्षांत केवळ १८ टन कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात आली आहे. आकडेवारी आणि प्रत्यक्षातील कचरा यांच्यात तफावत असून दररोज उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याची कोणतीही अधिकृत नोंद नाही. त्यामुळे कचऱ्यावर खर्च होणाऱ्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप होत आहे.
पालघर शहरात सध्या दररोज २८ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन होते. त्यामध्ये १० मेट्रिक टन ओला कचरा, १८ मेट्रिक टन सुका कचरा व दोन टन इतर कचऱ्याचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांतील संकलनाच्या विचार केल्यास शहरातून किमान १४०० मेट्रिक टन ओला कचरा गोळा होणे अपेक्षित आहे. या कचऱ्यापासून कंम्पोस्ट खताची मोठय़ा प्रमाणात निर्मिती होणे गरजेचे असताना गेल्या चार वर्षांच्या कालावधीत अवघ्या १९ टन कंम्पोस्ट खताची निर्मिती झाली आहे.
कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्यासाठी नगर परिषदेकडे चार टन क्षमतेचे खड्डे असून त्यामध्ये दररोज जेमतेम १२०० किलो कचरा टाकला जातो. प्रत्यक्षात निर्मित होणारा ओला कचरा व त्यावर होणारी प्रक्रिया यामध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत असून प्रत्यक्षात कचऱ्याची निर्मिती होत असताना फुगीर आकडेवारीच्या आधारे गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे शहरात गोळा होणार अधिकतर कचरा कोणत्याही प्रक्रियेविना कचराभूमीत टाकला जात असून त्यावर देखरेख करण्यासाठी नगर परिषदेकडे यंत्रणा नाही.
दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या वजन नोंदी ठेवणे अपेक्षित असताना नगर परिषदेकडे याची माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी कचरा निर्मिती वाढत असल्याचे भासवून ठेकेदाराच्या लाभासाठी या सर्व आकडेवारीशी नगर परिषद खेळत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कचरा सर्वेक्षणात दिलेली आकडेवारी प्रत्यक्षात गोळा होणारा कचरा व कंपोस्टिंग केला जाणारा कचरा यामध्ये मोठी तफावत असून पालघर नगरपरिषदेमध्ये कचरा घोटाळा झाला असल्याचे आरोप होत आहे. कचरा ठेकेदाराकडून कचरा वाहून किंवा संकलित करताना तो सुरक्षितरीत्या वाहून नेणे आवश्यक आहे. मात्र पालघर नगर परिषदेमध्ये कचऱ्याच्या ठेकेदारामार्फत दोन उघडे ट्रक हा कचरा संकलित करण्यासाठी फिरत आहेत. त्यामुळे ओल्या कचऱ्याची दुर्गंधी व त्यातून रस्त्यावर पडणारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी यामुळे सर्वत्र नागरिक हैराण आहेत.
एकाच ठेकेदाराला काम
गेल्या पाच वर्षांपासून पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये एकाच ठेकेदाराला कचरा ठेक्याचे काम दिले जात आहे. आर्थिक हितसंबंध जोपासून या ठेकेदाराला काम मिळावे यासाठी प्रशासन कागदोपत्री काम व्यवस्थित असल्याचे दाखवून पुन्हा त्याच ठेकेदाराला काम मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते.
कचरा संबंधातील प्रत्यक्ष माहिती त्याच विभागाला माहिती नाही. बेजबाबदारपणे काम करीत असल्याने कचरा घोटाळा झाला आहे. अवाच्या सवा केलेला खर्च संशयास्पद आहे.
-भावानंद संखे, विरोधी पक्षनेता, पालघर नगरपरिषद
सभापती म्हणून दोन महिनेच झाले आहेत. कचरा व कंपोस्ट खताबाबतीत माहिती तयार करून मागवली आहे. या प्रकारात घोटाळा असल्यास कारवाई करू. लक्ष घालून प्रशासकीय घडी बसविण्याचा प्रयत्न करत आहे.
-अक्षय संखे, सभापती, आरोग्य समिती, पालघर नगरपरिषद