लोकसत्ता वार्ताहर

पालघर : जिल्ह्यात सर्वत्र हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी कीर्तन, पालखी, मिरवणूक यासह सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासह जिल्हातील प्रसिद्ध असलेल्या डहाणू येथील श्री महालक्ष्मीची, केळवे येथील श्री शितलादेवीची व अनेक एकदिवसीय जत्राची तयारी पूर्ण झाली असून गावागावांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

श्री हनुमान जयंती निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी व मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हनुमान जयंती पासून सुरू होणाऱ्या डहाणू येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मीची पंधरा दिवसीय जत्रेकरिता लाखोंच्या संख्येने भावीक येत असल्याने मंदिर संस्थान व प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. तसेच मंदिरांना विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

केळवे येथील प्रसिद्ध श्री शितलादेवी मंदिर व हनुमान देवस्थान संस्थांच्या वतीने हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी पासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय जत्रेस आजपासून प्रारंभ होत असून हनुमान जयंतीच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी होते. तसेच तिसऱ्या दिवशी गावात पालखी फिरवली जाते. सातपाटी येथील श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीने पहाटे पाच वाजता जन्मोत्सवाच्या कीर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर सातपाटी गावातून पालखी काढण्यात येणार आहे.

वाडा तालुक्यात आंबिस्ते खुर्द व जांभळ्याचा पाडा येथील मारुती देव ट्रस्ट, कोनसई पालसई, नेहरोळी, देवळी – मानिवली या गावांमध्ये तसेच विक्रमगड तालुकामधील कुर्झे येथे हनुमान मंदिरात हनुमान जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आंबिस्ते खुर्द येथील हनुमान जयंतीला २२५ वर्ष पुर्ण झाली आहेत. हनुमान मंदिरातून रात्री ११ वाजल्यापासुन पहाटे ५ वाजेपर्यंत मारुतीचा मुखवटा घालून गावातून पालखी काढली जाते. तर दुसऱ्या दिवशी येथे जंगी कुस्त्यांचा सामना होतो. हि परंपरा कायम राहिली आहे. या कुस्त्यांसाठी महाराष्ट्रातून नावाजलेले पैलवान येत असुन पंचक्रोशीतील नागरिक हा सामना बघण्यास मोठी गर्दी करताना पाहायला मिळते. पालसई, नेहरोली, देवळी येथे हनुमान जयंती वडीलोपर्जित १०० वर्षांपासून साजरी होते.

डहाणू तालुक्यातील कासा जवळील वाघाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात कासा, चारोटी, वाघाडी परिसरातील हजारो भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. डहाणू जवळील सावटा येथील शनी मंदिर, चारोटी नाका येथील हनुमान मंदिर व हनुमान मंदिरात सुद्धा हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पालघर येथील जुना पालघर परिसरातील श्री हनुमान मंदिरात हनुमान सेवा मित्र मंडळाच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठन करण्यात येणार आहे. श्री मारुती मंदिर ट्रस्ट पालघरच्या वतीने आरोग्यम स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने सकाळी नऊ ते बारा वाजे दरम्यान विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भाविकांकरिता सुख सोयी

मंदिरा बाहेर दर्शनाकरिता भाविकांच्या लांबच लांब लागत असल्याने उन्हाच्या तडाखापासून वाचवण्यासाठी श्री शितलादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा मंदिराबाहेरील परिसरात सूक्ष्म पाण्याचे शिंतोडे (वॉटर फॉगर) लावण्यात आले आहे त्यामुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे. यासह पार्किंग, पाण्याची सोय, शौचालय व गैरप्रकार होऊ नये या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील इतर यात्रा

हनुमान जयंती निमित्त डहाणू येथील श्रीमहालक्ष्मी माता मंदिर (१५ दिवस), केळवे येथील (श्रीशितलादेवी मंदिर), सफाळे येथील चटाळे, एडवण येथील (श्रीआशापुरी देवी मंदिर), वेढी येथील (श्रीहरबादेवी मंदिर), विवळवेढे येथील (श्रीमहालक्ष्मी माता मंदिर), माहीम येथील (श्री वेडूमाता मंदिर), दांडी येथील (श्री उच्छळा माता मंदिर), पालघर मधील नवली व नंडोरे, दातीवरे व कोरे येथे हनुमान जयंती निमित्त जत्रा भरतात.