बोईसर : पालघर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. धरणांचे दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यात गेल्या गेल्या चार दिवसांत सरासरी ३०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धामणी, वांद्री, कुर्झे, वाघ, डोमहिरा ही धरणे आणि मनोर,केळवा माहीम, देवखोप, रायतळी, खांड आणि मोहखुर्द हे बंधारे तुडुंब टक्के भरले आहेत.

सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी धरणाची २७६ दलघमी पाणी साठवण क्षमता असून धरणात सद्यस्थितीत २७३ दलघमी (९९.०६%) पाणीसाठा निर्माण झाल्याने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता धरणाचे वक्र दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात येऊन सूर्या नदीत पात्रात ८४७५ क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे सूर्या नदीची पाणी पातळी मासवण येथे ६.४० मीटर झाली असून डहाणू व पालघर तालुक्यातील नदीच्या दोन्ही काठावरील गावांतील नागरीकांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी संध्याकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊन रस्ते आणि पुलावरून जाणारे पाणी ओसरल्याने बंद पडलेली वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली.

वांद्री धरण ओव्हरफ्लो :

पालघर तालुक्यातील गांजे ढेकाळे जवळील वांद्री धरण मंगळवारी ओव्हरफ्लो झाले. धरणाची पाणी पातळी ४३.६० मीटर झाली असून धरण १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले. तर वाघ, डोमहिरा मनोर,केळवा माहीम, देवखोप, रायतळी, खांड आणि मोहखुर्द या बंधाऱ्यामध्ये देखील १०० टक्के पाणीसाठा तयार झाल्याने वर्षभरासाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

मोडकसागर आणि तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग :

मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. यामुळे तीन ही धरणे १०० भरली असून बुधवारी दुपारी एक वाजता मोडक सागर धरणातून ४९१५६ क्युसेक तर तानसा धरणांतून ३८६८४ क्युसेक पाण्याचा वैतरणा आणि तानसा नदी पात्रात विसर्ग सुरु आहे. वैतरणा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैतरणा नदीची पाणी पातळी १००.८० मीटर झाली असून १०१.९० मीटर या इशारा पातळी पर्यंत पोचली आहे. वैतरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास मनोर जवळ वैतरणा नदीचे पाणी मस्तान नाका मनोर पालघर रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आले असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पिंजाळ १०२.७५ मीटर आणि देहरजा ९७.१० मीटर या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपर्यंत पोचल्याने वाडा, विक्रमगड, पालघर आणि वसई तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

समुद्रात गेलेल्या सर्व बोटी सुरक्षित :

पालघर जिल्हा प्रशासनाकडून मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे २१ ऑगस्टपर्यंत मच्छीमारानी बोटी घेऊन समुद्रात जाऊ नये असं आवाहन केल्यानंतरही १९ बोटी समुद्रात मच्छीमारीसाठी गेल्या होत्या. त्यापैकी दहा बोटी मूळ बंदरात सुखरूप पोचल्या असून पाच बोटी डहाणू येथे परतण्याच्या मार्गावर आहेत तर चार बोटी ह्या गुजरातच्या पोरबंदर बंदरात पोचल्या आहेत. समुद्रात मासेमारीसाठी केलेल्या सर्व बोटी सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.