बोईसर : आरोग्यासाठी घातक आणि स्थानिक प्रजातींचे मासे नष्ट करणाऱ्या बेकायदा मंगूर मासेपालनाची शेती पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पालघर तालुक्यातील  कुडे गावात महामार्गाच्या हनुमान मंदिराच्या पश्चिमेला शंभर मीटर अंतरावर वन विभागाच्या जागेवर पाच तलाव खोदण्यात आले आहेत. तलावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून बेकायदा मंगूर मासेपालन होत असल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. मनोर पोलिसांनी शनिवारी  कारवाई करीत तलावाची राखण करणाऱ्या कामगाराला ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी पत्र दिले होते. परंतु मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी बैठकीत व्यस्त असल्याचे कारण पुढे करून दोन दिवसांपासून कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आदिवासी आगरी कुणबी एकता मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केला आहे. मंगळवारी सायंकाळी मत्स्यव्यवसाय विभागाचे उपायुक्त दिनेश पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र बुधवापर्यंत मंगूर मत्स्य शेतीवर कारवाई करण्यात आली नसल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

मंगूर मासेपालन आणि विक्रीच्या व्यवसायामध्ये परप्रांतीय व्यापारी कार्यरत आहेत. मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकाऱ्यांचे मंगूरपालन आणि विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याचा आरोप मंडळाने केला आहे.

प्रजाती नष्ट होण्याची भीती

मंगूर मासेपालन सुरू असलेल्या तलावालगत मोठा नैसर्गिक नाला वाहत आहे. नाला पुढे जाऊन वांद्री नदीला जाऊन मिळत आहे. तयार झालेले मंगूर मासे पकडण्यासाठी संपूर्ण तलाव रिकामा करावा लागत असल्याने मंगूर मासे नाल्यात जाऊन पुढे नदीत जात आहेत. आक्रमक आणि खादाड प्रवुत्तीचे मंगूर मासे नाले आणि नदीमधील स्थानिक प्रजातींच्या माशांना फस्त करीत असल्याने स्थानिक प्रजातींचे मासे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बुधवारी मत्स्यव्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मंगूर मासे असलेल्या तलावाचा पंचनामा करण्यात आला असून पोलिसांच्या उपस्थितीत मंगूर मासे नष्ट केले जाणार आहेत. आगामी तलाव मालकांनी बेकायदा मंगूर मासेपालन करू नये यासाठी हमीपत्र घेतले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिनेश पाटील, उपायुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, पालघर