पालघर : मुंबईकडे नोकरी निमित्ताने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची महत्त्वाची गाडी असणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर मधील आरक्षित डब्यांमध्ये समूहाने प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांकडून पुढील स्थानकांमध्ये येणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांसाठी बेकायदेशीर पद्धतीने आसनांचे आरक्षण केले जात असून यामध्ये महिला प्रवाशांचा देखील समावेश आहे. त्यामुळे अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपमानास्पद वागणूक मिळत असून तिकीट काढून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आसने रिकामी असताना देखील अनेकदा उभ्याने प्रवास करावा लागत आहे.
दैनंदिन प्रवाशांची गाडी अशी ओळख असणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीमधील डबल डेकर डबे कमी करून त्याऐवजी इतर गाड्यांप्रमाणे सर्वसाधारण डबे बसवण्यात आले. या गाडीला डब्यांची संख्या वाढविण्यात आल्याने डबल डेकर डब्यांच्या बदलामुळे आसन क्षमतेमध्ये विशेष बदल झाला नाही असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान सकाळी मुंबईकडे या गाडीचा प्रवास सुरू असताना डहाणू वाणगाव परिसरातून चढणाऱ्या प्रवाशांकडून बोईसर, पालघर, केळवे रोड, सफाळे येथे येणाऱ्या आपल्या सहकारी प्रवाशांसाठी बॅगा अथवा इतर साहित्य घेऊन आसन आरक्षण करण्याची पद्धत पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे दरम्यानच्या स्थानात चढणाऱ्या अनियमित प्रवाशांनी आसनावर बसण्याचा प्रयत्न केल्यास आपले सहकारी येत आहेत, नाश्ता पाणी घेण्यासाठी खाली फलाटावर उतरले आहेत अथवा शौचालयात गेल्याचे कारण सांगून प्रवाशांना पुढे जाण्याची सूचना देण्यात येते. त्यामुळे अशा अनियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाद घालावा लागतो अथवा उभ्याने प्रवास करणे भाग पडत असल्याचे दिसून आले आहे.
संध्याकाळी याच गाडीच्या परतीच्या प्रवासाच्या प्रसंगी मुंबई सेंट्रलहुन निघणाऱ्या या गाडीमध्ये रेल्वेचे कर्मचारी तसेच विरार पर्यंत प्रवास करणारे दैनंदिन उपनगरीय प्रवासी आपल्या सहकाऱ्यांसाठी जागा अडवून ठेवत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या गाडीमध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण डब्यांमध्ये तिकीट तपासणी होत नसल्याने या बेकायदा आसन आरक्षण पद्धतीवर रोख लावण्यास रेल्वे व्यवस्थापन अपयशी ठरले आहेत.
याबाबत पश्चिम रेल्वे च्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही.
प्रथम दर्जातील तिकीट तपासणीस हतबल
वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीला तीन प्रथम दर्जाचे डब्बे असून यामधून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांकडून बेकायदा आसन आरक्षण पद्धतीचा अवलंब राजरोसपणे केला जातो. विशेष म्हणजे या तीन डब्यात प्रवाशांची तपासणी करण्यासाठी दोन तिकीट तपासणीस कार्यरत असताना देखील त्यांच्याकडून बेकायदा आसन आरक्षणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे विरार येथून मोठ्या प्रमाणात उपनगरीय सीजन तिकीट असणारे प्रवासी या गाडीच्या प्रथम दर्जा डब्यांमध्ये चढत असून विरार ते दादर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची टिकीट तपासणी करण्यास संबंधित रेल्वे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. अशा बेकायदा आरक्षणाविरुद्ध रेल्वे प्रशासनाने ठोस कारवाई करावी अशी मागणी अनियमित प्रवाशांकडून केली जात आहे.