कारवाईत वाहने, वाळूसाठा जप्त

डहाणू : डहाणू समुद्र किनाऱ्यावरून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर  प्रांतधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत वाळूसाठय़ासह  तीन वाहने जप्त  केली आहेत. धाकटी डहाणू, चिंचणी, दिवा दांडा, डहाणू मांगेलवाडा, डहाणू दूबळपाडा , सतीपाडा, नरपड, आगर, चिखला, झाई, समुद्र किनाऱ्यावर  वाळूच्या तस्करीसाठी   करण्यात येणाऱ्या उत्खननामुळे समुद्र किनारे मोठया प्रमाणात खचत आहेत. डहाणूनजीक  येथील समूद्राच्या वाळू उपशावर लाखोंचा व्यवसाय तेजीत असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात केवळ   वाळू माफियांचेच राज्य असल्याने स्थानिकांनाही त्यांना रोखण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. यात लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे.

वाळू थेट सरकारी कामांना  वापरली जात असताना महसूल विभागाची कारवाई होताना दिसत नाही.  सतीपाडा अणि चिखला येथे तर मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत.  सुरुची बाग, बंदर किनाऱ्याची धूप  होत आहे.  बहुतांश झाडे आणि वाळू खचू लागली आहे.  वाळू चोरीसाठी तर समुद्रात  थेट पिकअप,  बैलगाडयाा  आणून वाळूची वाहतूक केली जाते.  जवळपास तीन ते चार फूट ख़ोल आणि १० ते १७ फूट लांब खड्डे खणले जातात. या कामात दिवसा  लहान मुले, महिलांना गोववून होणाऱ्या कारवाईपासून दूर राहण्याचा वाळूमाफियांचा हेतू असल्याचे सांगितले जाते. कवडीमोल मोबदल्यात स्थानिक मजूरांकडून वाळू बाहेर आणून देण्याचे काम केले जात असल्याचे पाहायला मिळते. त्यांनंतर मध्यरात्र ते पहाटे सकाळी ही वाळू वाहून नेली जाते, असे परिसरातील ग्रामस्थांकडून सांगितले जाते.

वाळू चोरी पकडण्यासाठी प्रशासनाने पथक तयार केले आहेत. तालुक्यातील अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

-अभिजित देशमुख, तहसीलदार