डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड या तीन तालुक्यातील सात ग्रुप ग्रामपंचायतींच्या विभाजन प्रलंबित असून यातील दोन ग्रुपग्रामपंचायतींचे ठराव शासन स्तरावर पाठवण्यात आले आहेत. यातील काही ग्रामपंचायतींनी याआधी प्रस्ताव सादर केले होते. मात्र मुदत कालबाह्य झाल्यामुळे पुन्हा नव्याने ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पालघर मधील डहाणू तालुक्यातील वरोर, कैनाड, धरमपुर, वणई, विक्रमगड मधील खुडे, डोल्हारी खुर्द आणि पालघर मधील मायखोप या सात ग्रुपग्रामपंचायतींनी विभाजनासाठी प्रस्ताव सादर केले होते. मात्र हे प्रस्ताव कालबाह्य झाल्याचे ग्रंपंचायातींना नव्याने प्रस्ताव सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. यातील वरोर आणि धरमपूर ग्रामपंचायतींनी नव्याने प्रस्ताव सादर केले असून हे प्रस्ताव पुढील कारवाई साठी वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अंतर जास्त असल्यास काम करण्यासाठी अडचणी निर्माण होत असून ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांना धावपळ कारवाई लागत आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या वाढल्यामुळे अडचणी निर्माण होत असून विकास कामांसाठी निधी अपुरा पडत असल्यामुळे ग्रामपंचायतींचे विभाजन करण्याची गरज निर्माण होत आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे विभाजन करण्याची गरज असून ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव घेऊन पंचायत समिती मध्ये प्रस्ताव सादर करण्याची गरज अधोरेखीत होत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत विभाजन करून विभक्त ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले निकषाप्रमाणे कारवाई करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात ग्रामपंचायत विभाजन करणे शक्य नसून निवडणुकीनंतर दोन वर्षांनी विभाजनाचे प्रस्ताव सादर करता येतात. सध्या अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन दोन वर्ष पुर्ण झाले असून ग्रुप ग्रामपंचायतींनी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सात ग्रुप ग्रामपंचायतींनी विभाजन करण्यासाठी अर्ज केले होते. हे अर्ज कालबाह्य झाल्यामुळे नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या दोन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आलेले असून ते वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार आहेत. – चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी