डहाणू/ कासा : डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, कासा, गंजाड परिसरात आज (१७ ऑगस्ट) पहाटे ६.३५ वाजताच्या सुमारास तीव्र आणि सौम्य स्वरूपाचे दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज पहाटे ६.३५ च्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का बसला असून ६.४० च्या सुमारास दुसरा सौम्य धक्का जाणवला. दोन धक्क्यांपैकी एकाची तीव्रता ३.६ रिष्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असून याची खोली १० किलोमीटर इतकी आहे. तर दुसरा धक्का हा सौम्य असल्यामुळे त्याची नोंद झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

पालघर जिल्ह्यात २०१८ पासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रकार सुरू आहेत. मध्यंतरी भूकंपाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धोका टळल्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत असून भूकंप प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : पालघर चे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर त्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील होती. मात्र किमान दोन तास त्याविषयी संबंधित संकेतस्थळावर माहिती उपलब्ध न झाल्याने हे धक्के सौम्य असावेत असा शासकीय यंत्रणेचा समज झाला. मात्र नंतर भूकंप संकेतस्थळावर घडलेल्या भूकंपाची तीव्रता निर्देशित करण्यात आल्यानंतर ३.६ तीव्रतेचा भूकंप झाल्याचे स्पष्ट झाले. शासकीय संकेतस्थळावर याचा प्रभाव व्यापक दृष्टीने दिसत असला तरी त्याची तीव्रता डहाणू तालुक्यात जाणवल्याचे सांगण्यात आले. या भूकंपात कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती अजून पर्यंत पुढे आली नाही.