पालघर: पावसाळा सुरू झाल्यापासून पालघर शहरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालघर रेल्वे स्टेशन परिसर तसेच माहीम, मनोर, बोईसर, टेंभोडे कडे जाणारे मुख्य रस्ते, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, हुतात्मा चौक यासह डुंगीपाडा व सेंट जॉन महाविद्यालयाच्या वळणावर देखील खड्डे पडल्यामुळे सर्वच नागरिकांचा प्रवास खड्ड्यातून होत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून किरकोळ अपघात हे आता नित्याचे झाले असल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
रेल्वे स्टेशन परिसर
पालघरचे प्रवेशद्वार असलेला पालघर रेल्वे स्टेशन परिसर हा सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत गजबजलेला भाग आहे. याच भागात रिक्षा स्टॅन्ड, बस स्थानक, भाजी बाजार, मासळी बाजार व मोठमोठी दुकाने असल्याने वाहनांची व नागरिकांची वर्दळ सुरू असते. मात्र स्टेशन परिसर व स्टेशन कडे येणाऱ्या दोन्ही मार्गांवर मोठमोठाले चिखलयुक्त खड्डे पडले असल्याने या भागातून प्रवास करणे कठीण होत आहे. रोज होणाऱ्या वाहतूक कोंडी मध्ये या खड्ड्यामुळे भर पडली आहे.
पालघर बोईसर मार्ग
मुख्यालयाचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या पालघर बोईसर रस्त्याच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ वळणावर जवळपास एक फूट खोल तर चार ते पाच फूट रुंद खड्डे पडले आहेत. या मार्गावर तीन शाळा, दोन महाविद्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय व पालघर औद्योगिक वसाहत असल्याने या रस्त्यावरून सतत वाहतूक सुरू असते. तसेच या मार्गावर गोठणपूर नाक्याजवळ ५० ते १०० मीटरच्या रस्त्याची दरवर्षी चाळण होते. पावसाळ्यापूर्वी बुजवण्यात आलेले खड्डे पहिल्या पावसातच उघडे पडतात. या मार्गावरून प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी सतत प्रवास करत असून प्रशासनाला मात्र या रस्त्याचा विसर पडला आहे.
जुना मनोर रस्ता
गेल्या दोन महिन्यात जवळपास ५०० मीटरचा रस्ता काँक्रीटकरून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. मात्र डुंगीपाडापासून स्मशानभूमी व पुढे घोलविराकडे जाणाऱ्या रस्त्याची मात्र दुर्दशा झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग उतरल्यानंतर तीन रस्ते जुळतात त्या ठिकाणी मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्या दरम्यान यामध्ये पाणी साचत असल्याने त्याचा अंदाज येत नसून बस व अवजड वाहनांनी अनेक झटके या रस्त्यावर खाल्ले आहेत. तर स्मशानभूमीपासून घोलवीरापर्यंत ५०० मीटरच्या रस्त्याचे डांबर पूर्णतः उखडून गेले असून या रस्त्याची देखील चाळण झाली आहे. या रस्त्यावरून महाविद्यालयाकडे जाणाऱ्या शेकडो रिक्षा दिवसभर वाहतूक करत असल्याने या खड्ड्यांमधील चिखल युक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडण्याचे प्रकार रोजच घडत आहेत. या मार्गावर अनेक किरकोळ अपघात झाले असून प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा संताप्त सवाल येथील नागरिक करत आहेत.
माहीम व टेंभोडे रस्ता
सर्वाधिक दुकाने, खाजगी रुग्णालय, मोठमोठी गृह संकुले व सतत वाहतुकीचा असलेला सद्गुरु हॉटेल कडून गणेश कुंडाकडे येणाऱ्या अंतर्गत काँक्रीट रस्त्याची देखील अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून सतत अवजड वाहतूक सुरू असल्याने याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. तर या भागात असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णवाहिका देखील यातून वाट काढून आपला प्रवास करतात. अनेक ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्याला चिरा गेल्या असून ठीक ठिकाणी उंचवटे तयार झाले आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक देखील खड्ड्यांनी व्यापलेला असल्याने या भागात वळण घेताना सावधगिरी बाळगावी लागत आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल
नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागासाठी हे खड्डे अदृश्य झाले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. एक एक फुटाचे खड्डे रस्त्यावर तयार झाले असून ते बुजवणार कधी. पावसाळा पूर्व नियोजन करणे गरजेचे असताना ते केले जात नाही. मात्र नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःची जबाबदारी झटकत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या त्रासाचे व होणाऱ्या हालाचे सोयरसुतक नाही. किरकोळ अपघात, कंबर दुखीचा त्रास, वाहनांचे नुकसान नित्याचे झाले असून प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहेत. मान्सून पूर्व गटार सफाईचे योग्य नियोजन नसल्यामुळे पावसाचे पाणी गटारात जाण्याऐवजी गटारचे सांडपाणी व गाळ रस्त्यावर येत आहे. चालायला व्यवस्थित पदपथ नसल्याने रस्त्याच्या कडेला चालताना पादचाऱ्यांच्या अंगावर वाहनांकडून चिखल उडवला जात आहे.
मान्सूनपूर्वी विकास कामांवर खर्च करण्यात आलेला करोडो रुपये निधी गेला कुठे? रस्ते बांधणी सोडा पण रस्त्यातील खड्डे देखील बुजविले नाहीत मग शहरातील विकास कामे झाली कुठे? एखाद्या अपघातात गंभीर जखमी किंवा एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रशासन खडबडून जागे होणार आहे का असा सवाल संतप्त नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाच्या लाजेपोटी नागरिकांकडून खड्डे बुजवणी
ठीक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांवर कडे प्रशासन ढुंकूनही बघत नसल्याने अनेक रस्त्यांवर समाजसेवी संस्थेची युवा पिढी, रिक्षा चालक, दुकानदार व त्या भागातील नागरिक अपघाताच्या भीतीपोटी खड्डे बुजवत आहेत. काही खड्डे प्रवासादरम्यान निदर्शनास येत नसल्याने अपघात होत असल्याने खड्ड्याच्या आजूबाजूला दगडे, खड्ड्यामध्ये ड्रम किंवा झाडांच्या कुंड्या, खड्ड्याच्या बाजूला बॅरीकेड अशा प्रकारचे अडथळे निर्माण करून हे खड्डे नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न काही नागरिक करत आहे.
शहरातले सर्वच रस्त्यांच्या खड्डे भरण्याचे आदेश देखभाल दुरुस्तीमध्ये देण्यात आले आहे. विकास कामांसाठी वार्षिक ठेका देण्यात येत असून त्यामधून हे काम करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने डांबर व कॉन्क्रीटमळे खड्डे भरण्यात येत नव्हते त्यामुळे तात्पुरती खडी टाकण्यात आली होती. आज संध्याकाळपासून ही खड्डे बुजवणे सुरुवात होणार आहे. – गौरव साळुंखे, अभियंता पालघर नगर परिषद