पालघर : जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. मात्र असे असताना जिल्ह्यात यलो अलर्ट पेक्षाही कमी ४३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याने रेड अलर्टचा हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरला आहे. परत जिल्ह्यात अनेक ठिकाणी ३० मिलिमीटर पेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे.
मागील आठवड्यापासून जिल्ह्यात मोसमी पावसाने जोर धरला होता. बुधवारी सकाळी काही वेळ उसंत दिलेल्या पावसाने सायंकाळपासूनच जोरदार हजेरी लावली होती. हवामान विभागाकडून पालघर जिल्हा करिता रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. मात्र दिवसभरात अधून मधून जोरदार सरी तर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र रेड किंवा ऑरेंज अलर्ट सारखा पाऊस देखील न झाल्याने हवामान विभागाच्या इशाऱ्यावर नागरिकांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे.
जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी २७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाद्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यांमध्ये १९ जून रोजी काही ठिकाणी अत्यंत जोरदार आणि इतर सर्व भागातही मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच २० ते २३ जून दरम्यान सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार असून काही ठिकाणी जोरदार तर सर्व भागात मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील ३ – ४ दिवस भात रोपवाटिकेची पेरणी व फळ झाडे लागवड करण्यात येऊ नये असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र यांच्याकडून करण्यात आले आहे.
रेड अलर्ट मात्र शाळा कार्यालय सुरू
रेड अलर्ट असताना शाळा व इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांना सुरक्षेच्या दृष्टीने आदल्या दिवशीच सुट्टी जाहीर करण्यात येत असते. मात्र जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी दुपारी दोन नंतर रेड अलर्ट बाबत जाहीर करण्यात आले. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. तसेच पाऊस देखील नियंत्रणात असल्याने दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज
पालघर जिल्ह्यात १६ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २१ व २२ जून रोजी पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी उघडीपही राहू शकते. २३ जूननंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. २४ ते २६ जूनदरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच २७ जून ते ३ जुलै या कालावधीत देखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी भात रोपवाटीकेची पेरणी लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. २१ आणि २२ जून रोजी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता असल्याने भात रोपवाटीकेची पेरणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी केले आहे. गादी वाफ्यावर भात पेरणी करताना चारही बाजूंनी खोल चर काढावेत जेणेकरून जास्त पावसातही पाण्याचा निचरा होईल आणि कोवळी रोपे सडण्याचे प्रमाण कमी राहील. वादळी वाऱ्याचा फळझाडांवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता, नुकतीच लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार देऊन बांधणी करावी व मातीची भर टाकावी. फळबागांमध्ये अतिरिक्त पाणी साचू नये म्हणून निचऱ्याची व्यवस्था करून ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
१९ जून रोजी झालेला पाऊस मिलीमीटर
वसई – ४२.६
वाडा – ३८
डहाणू – ३९.०१
पालघर – ३६.२
जव्हार – ३०.८
मोखाडा – १०१.७
तलासरी – ५०.८
विक्रमगड – ३६.७
सरासरी – ४३.५