जिल्ह्य़ासाठी आणखी सव्वा कोटी; डोंगरी भागासाठी सहा कोटी ६९ लाख

पालघर : राज्य सरकारने पालघर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नव्याने आठ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी सहा कोटी ६९ लाख रुपये जिल्ह्यातील डोंगरी भागात दिला आहे. या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी सोपविल्याने कामे योग्य प्रकारे पूर्ण करून घेणे आव्हानात्मक ठरणार आहे.

जिल्ह्यातील आदिवासी भागात पर्यटनाला चालना देऊन रोजगारनिर्मिती करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने जिल्हा स्थापनेपासून सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र या कामांपैकी अनेक कामे प्रत्यक्ष न करता निधी परस्पर वितरित केला गेल्याने या भागातील अपेक्षित विकास झाला नाही. आगामी काळात दृश्यमान स्वरूपातील कामे हाती घेण्याचे जिल्हा प्रशासनाने योजिले असून गेल्या तीन वर्षांतील पर्यटन विकासांतर्गत झालेल्या कामांचा आढावा व लेखापरीक्षण घेण्याचे जिल्हा प्रशासनाने सूचित केले आहे.

राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ३१ जानेवारी रोजी व २३ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार पालघर जिल्ह्याला अनुक्रमे ८.२० कोटी व ८.२८ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. विशेष म्हणजे यापैकी फक्त १.५९ कोटी रुपयांचा निधी बंदर पट्टीच्या भागात देण्यात आला आहे. या पर्यटन विकास निधीमुळे डोंगरी भागातील पायाभूत सुविधांचा स्तर उंचाविण्याची संधी निर्माण झाली आहे.

प्रस्थापित पर्यटन केंद्राकडे दुर्लक्ष

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या २८ पेक्षा अधिक पर्यटन स्थळांकडे राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. एकीकडे माहीम, शिरगाव, केळवे बोर्डी या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात निधी वितरण करण्यात आले असताना डोंगराळ भागातील मोऱ्या, काँक्रीट गटार बांधणे, संरक्षक भिंत बांधणे इत्यादी कामांवर बेसुमार निधी वर्ग केल्याचे दिसून आले आहे. हिरड पाडा धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रत्यक्षात यापूर्वी नामफलक बसवण्यासाठी खर्च झाला असताना नव्याने या कामासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

दरम्यान, ३१ जानेवारी रोजी वर्ग करण्यात आलेल्या ८ कोटी २० लाखांत सुरक्षा, सुविधा, सुशोभीकरणावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये मोखाडा गांधी पूल येथे पर्यटकांसाठी शौचालय बांधणे (२० लाख), मोखाडा ते देवबांध रस्त्यावर अपघात वळणांवर संरक्षण भिंत (५० लाख), वाशाळा येथे पर्यटन गावात गाव तलावात गोबी गाठ बांधणे (२५ लाख) मध्य           वैतरणा पूल ते खोडाळा पर्यटन स्थळ रस्त्यावर अपघाती ठिकाणी सुधारणा करणे (९९.९९ लाख), खोडाळा पर्यटन स्थळ येथे स्वागत कमानी बांधणे (९९.९४ लाख), खोडाळा पर्यटन स्थळ ते कारेगाव रस्त्यावर अपघात ठिकाणी रेलिंग बसवणे (७४.९४ लाख), विक्रमगड शिवगोरक्षनाथ मठ कावठे परिसरात भिंत बांधणे (१० लाख), हातोबा देवस्थान शनी मंदिर रस्त्यावर संरक्षक भिंत (३ लाख), हनुमान पॉइंट सुशोभीकरण करणे, उद्यान बनवणे तसेच सनसेट पॉईंट सुशोभीकरण करणे, जामसर देवतळी तलावाचे  , खडखड धरणाजवळ सुशोभीकरण   प्रत्येकी (५० लाख), माहीम बीचवर जलव्यवस्था, स्वच्छतागृह बांधणे (प्रत्येकी ३ लाख), शिरगाव बीचवर हायमास्क लावणे (प्रत्येकी ३ लाख), शिरगाव बीचवर बैठक व्यवस्था करणे (१३ लाख)   मुरबे येथे समुद्र केल्यावर पाथवे तयार करणे (८९ लाख), उनभाट येथे कूपनलिका करून चेंजिंग रूम, बाथरूम व्यवस्था करणे (१० लाख), कोकणेर शिव मंदिराजवळ आवारात पार्किंग शेड बांधणे (१० लाख) आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. 

सव्वाआठ कोटींत सुविधा काय?

झाई मच्छीमार वसाहतलगत समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण (११.१४ लाख), बोर्डी खारिया तलाव सुशोभीकरण (११.१९ लाख)

खोडाळा ते नाशेरा रस्त्यावर संरक्षण भिंत बांधणे (९९.२६ लाख), आडोशी ते शिरसगाव रस्त्यावर पाईप मोऱ्या व गटर बांधणे (९५.२५ लाख)

मोखाडा ते देवभाध रस्त्यावर नामफलक बसवणार (९७.२५ लाख), देवबांध आडोशी ते खोडाळा रस्त्यावर मोऱ्या, काँक्रिट गटार (९५.९५ लाख), खोडाळा येथील स्वामी समर्थ मंदिर पर्यटन परिसरातून सुधारणा करणे (१५० लाख), खोडाळा तेदेवबांध रस्त्यावर अपघाती वळण काढणे (९८.२५ लाख)

देवतळी येथील तलावाचे सुशोभीकरण करणे, पेवर ब्लॉक बसवणे, रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (१०० लाख), देवतळी येथे तलावास घाट बांधणे, तलावातील गाळ काढणे व सुशोभीकरण करणे (५० लाख)