प्रस्तावाची दोन वर्षांपासून रखडपट्टी
पालघर : पालघर तालुक्यात असणाऱ्या वाढीव बेटाचे लगतच्या समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी असलेला खारभूमी बंधारा फुटलेल्या अवस्थेत असून त्याच्या पुनर्बाधणीसाठी निधीच्या उपलब्धतेचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. सफाळा- वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यान असणाऱ्या वाढीव बेटाच्या पूर्व व दक्षिणेच्या बाजूने खाडीचे पाणी रोखण्यासाठी १९५६ साली बांधलेल्या खारभूमी बंधाऱ्यात अनेक ठिकाणी भगदाड पडले असून त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांनी विविध ठिकाणी पाठपुरवठा केला आहे. या बंदराच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा निधी नसल्याने बंधाऱ्याची हंगामी पद्धतीने डागडुजी स्थानिकांच्या मदतीने करण्यात आली होती.
या बंधाऱ्याला सन २०१९ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याची निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली. ही योजना जागतिक बँकेच्या निधीमधून आखण्यात आली असून जागतिक बँकेकडून निधीची उपलब्धता होत नसल्याने हे काम प्रलंबित राहिल्याचे सांगण्यात येते. राज्य सरकारच्या खारभूमी विभागाने या कामाचा समावेश पुरवणी मागण्यांमध्ये राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात केला असून त्याला मान्यता मिळाल्यास उपलब्ध झालेले निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करणे शक्य होईल, असे खारभूमी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वाढीव गावात शिरणाऱ्या खाडीतील निमखाऱ्या पाण्यामुळे शेत जमिनीचे नुकसान झाले असून पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाली आहे.
वाढीव बेटावर पूर्वेकडून फुटलेल्या खारभूमी बंधारम्य़ातून निम खारे खाडीतील पाणी गावात शिरत असून गावातील अधिकतर विहिरीतील पाणी मचूळ व पिण्यास अयोग्य झाले आहे. त्याचबरोबरीने गावात असलेली शेती या पाण्यामुळे जवळपास संपुष्टात आली असून गावातील नागरिकांसाठी उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ग्रामस्थाने अनेकदा पाठपुरावा केला असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून गावातील हालाखीची परिस्थिती कायम आहे.
— हर्षद पाटील, रहिवासी वाढीव