पालघर : पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी व विशेषत: जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कामाचे तपशील दर्शविणारा फलक लावण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पायमल्ली होताना दिसून येत आहे. विकासकामांचा दर्जा राखण्याच्या तसेच दुबार पद्धतीने कामे होऊ नये या दृष्टीने विकासकामे सुरू असल्याच्या ठिकाणी कामाचा तपशील, अंदाजित रक्कम, काम पूर्ण करण्याचा अवधी इत्यादी तपशील ठळकपणे प्रसिद्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी अलीकडेच दिल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी या आदेशांचे उल्लंघन करून कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची माहिती प्रदर्शित केली जात नाही असे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर रस्त्यांच्या कामांतर्गत लहान मोऱ्या, साकव व पुलांची नव्याने उभारणी सुरू असून त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या फलकांची उभारणी केली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपघात होऊन किमान दोन नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अशा कामांच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ठेकेदाराकडून कामाचा तपशील याबाबत माहिती प्रदर्शित करणे आवश्यक असताना जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. बोईसर पास्थळजवळ बाणगंगा नदीवर ब्रिटिशकालीन पूल जमीनदोस्त करून त्या ठिकाणी महाविद्यालयाची उभारणी सुरू असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षासंबंधित फलक लावण्यात आले नाहीत. त्या कामासाठी सामाजिक दायित्व निधी दिला गेला असताना कामाचा तपशील किंवा नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाची माहिती प्रदर्शित केली नसल्याचे दिसून आले आहे.