दीपाली चुटके, लोकसत्ता

पालघर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी लाभार्थी महिलांकडून मोबाईल क्रमांक, पत्ता, बँक खात्यांचा तपशील अशी संवेदनशील माहिती भरून घेण्यात आली आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील ११,१७२ महिलांची माहिती समाजमाध्यमांमध्ये पसरल्यामुळे असंतोषाचे वातावरण आहे. यात मोबाइल आणि आधार क्रमांक नसल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी संपूर्ण राज्यातून अशी माहिती फुटल्याच्या शक्यतेमुळे लाभार्थी महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेकरिता जुलै महिन्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. ही माहिती गोपनीय राहील, अशी लाभार्थींची रास्त अपेक्षा असते. मात्र पालघरमधील आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसलेल्या ११,१७२ महिलांचा तपशील गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या निष्काळजीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी महिलांकडून करण्यात येत आहे. मात्र समाजमाध्यमांवर पसरलेल्या यादीमध्ये आधार व बँक खातेक्रमांक नसल्यामुळे धोका नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. योजनेचे अर्ज अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक तसेच इतर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविताना चुकून प्रसारित झाला असावा. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तर अशा प्रकारे माहिती प्रसारित होणे महिलांसाठी असुरक्षित असून प्रशासनाने तक्रार करणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> पालघर: डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

हजारो महिलांची माहिती सहजपणे कोणाच्या हातात लागली व गैरप्रकार झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? शासनाला आम्ही विश्वासाने माहिती पुरवतो. मात्र ती माहिती समाजमाध्यमांवर अशी प्रसारित होत असेलत तर ते धोकादायक आहे. याबाबत चौकशी करावी व माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी. – हर्षा हिरेन्द्र ठाकूर, बाधित

याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली असून लवकरच पुढील निर्णय घेण्यात येईल. आधार व बँक माहिती असती तर ते अतिधोकादायक झाले असते. मात्र मोबाइल क्रमांक व पत्ता फुटणेही भीतीदायक आहे. याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल.

– मल्लिनाथ कांबळे, महिला व बालकल्याण अधिकारी, पालघर जिल्हा परिषद

धोका काय?

●सायबर गुन्हेगारी वाढत संवेदनशील माहितीचा वापर करून महिलेच्या फसवणुकीची शक्यता आहे.

●मोबाइलवर सतत फोन, मेसेज करून महिलेला मानसिक त्रास दिला जाऊ शकतो.

●अनेकदा मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडले असल्यास हॅकिंगची भीती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●घराचा पत्ता सहज उपलब्ध झाल्यामुळे अनोळखी व्यक्तींकडून गैरप्रकाराची शक्यता आहे.