पालघर : केळवे या पर्यटनस्थळी २३ मे रोजी एका रिसॉर्टमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला असताना ३० मे रोजी अन्य एका रिसॉर्टवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गोळी झाडण्यात आली. या मुलीची प्रकृती स्थिर असली तरी या प्रकरणात पोलिसांनी आरंभी केलेले दावे फोल ठरले आहेत. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहत असून केळवेसह जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारांना पोलिसांकडून खतपाणी घातले जात आहे, असे आरोप नागरिक करत आहेत.

केळवे (राखाडे) येथील एका हॉटेलमध्ये बोईसर येथील एक प्रेमी जोडपे आले असताना दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास या मुलीच्या मानेत गावठी पिस्तूलची गोळी लागली. रक्तबंबाळ अवस्थेत या मुलीला प्रथम माहीम प्राथमिक आरोग्य केंद्र नंतर पालघर येथील खासगी रुग्णालय येथे तपासणी करून नंतर बोईसर येथील अधिकारी लाईफ लाईन या रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलीची प्रकृती स्थिर असून तिच्या प्रियकराला केळवे पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकारानंतर जखमी असलेल्या या मुलीला पोलीस वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा तिचा प्रियकर सोबत होता. यावेळी तो मुलगा स्वच्छतागृहात गेला असताना मुलीने स्वतःहून गोळी मारली असे पोलिसांकडून आरंभी सांगण्यात आले. तसेच ही मुलगी अल्पवयीन नसून २० वर्षांची असल्याचे पोलिसांची भूमिका होती. ज्या पद्धतीने व मुलीच्या मानेच्या भागात गोळी लागली आहे, ती मुलीकडून स्वतः पिस्तूल चालवून होणे शक्य नसल्याचे माध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच मुलीच्या वडिलांनी या संदर्भात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकारात पिस्तूल हाताळताना मुलाच्या हातून चुकून गोळी सुटली, अशी भूमिका बदलली. तसेच मुलीचे वय १८ वर्षांखालील असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका वादित ठरली आहे.

विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आलेल्या गोळीचा आकार पाहता ती गोळी गावठी पिस्तूलची नसून देशी बनावटीच्या रिव्हॉल्वरची असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिवाय रिव्हॉल्वरची सहजगत हाताळणी करताना मस्करीत अशाप्रकारे मानेला गोळी लागणे शक्य नाही, असे या मुलीच्या नातेवाईकांकडून आरोप होत आहेत. गावठी बनावटीच्या या कट्ट्याची ताकद कमी असल्याने गोळी शरीरात खोलवर शिरली नाही, असे तज्ञांचे म्हणणे असून मानेच्या दिशेने रोखून गोळीबार केला गेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी प्राथमिक जबाब नोंदवताना दबाव टाकला होता का, पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे का, पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार अपेक्षित असताना रिसॉर्ट मालकांची बाजू घेतली जात आहे का, असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत संशय व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांचे म्हणणे…

पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश धाराशिवकर यांच्याशी संपर्क साधला असता गावठी पिस्तूलची हाताळणी करताना प्रियकराकडून चुकून गोळी झाडली गेली असून या प्रकारात चौकशी सुरू आहे, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

केळवे येथील गैरप्रकारांना पुष्टी

काही दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणीच्या मृत्यूप्रसंगी मयत व्यक्ती फ्राईड राईस खात असताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची सबब पुढे करून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला रिसॉर्टमध्ये प्रियकराबरोबर राहण्याची अनुमती दिली गेल्याने केळवा येथे वेशाव्यवसाय व अनैतिक संबंधांना खतपाणी देण्याची व्यवस्था उभारण्यात आल्याबद्दल होत असलेल्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. पालघर येथे नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी जिल्ह्यामध्ये कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे सर्व पोलीस स्थानकांच्या प्रभारी अधिकारी यांना तंबी दिली होती. मात्र ते रुजू झाल्यानंतर आठवड्याभरातच ही घटना घडल्याने आगामी काळात पोलिसांकडून केळवा व इतर पर्यटन ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी आशा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वादावादीतून गोळीबार ?

अल्पवयिन मुलीने स्वतःहून गोळीबार केल्याचे सांगितले जात असून आपल्या जीवन संपवायचे आहे असे वक्तव्य तिने हॉटेल मालकासमोर गोळी लागल्यापूर्वी केले होते, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान या प्रेमी जोडप्यामध्ये वाद झाल्यानंतर या अल्पवयीन मुलीवर गोळीबार झाल्याचे देखील सांगण्यात येत असून गोळीबार करणारी व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याबाबतची माहिती या मुलीच्या पालकांनी पत्रकारांना दिली. मुळात शस्त्र परवाना नसताना पिस्तूल घेऊन प्रेयसीबरोबर रिसॉर्टवर जाण्याचा हेतू संशयास्पद असून घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.