पालघर : एकेकाळी शांत आणि रमणीय म्हणून ओळखला जाणारा पालघर जिल्ह्यातील शिरगाव समुद्रकिनारा आता मद्यपी आणि गैरवर्तन करणाऱ्या लोकांचे ‘पार्टी डेस्टिनेशन’ बनत असल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे. शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या बाकांची रचना ‘पार्टी टेबल’ प्रमाणे असल्यामुळे काचेच्या बाटल्याची पडलेली रास भविष्यात पर्यटनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जात असून त्या पाठोपाठ निसर्गरम्य, सागरी, नागरी आणि डोंगरी जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्याला झाई बोर्डी पासून वसईपर्यंत 112 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक समुद्रकिनारी फिरायला येत असतात. मात्र समुद्रकिनारी सुरू असलेल्या अशा पार्टीमुळे समुद्रकिनाऱ्याला गबाळ रूप प्राप्त होत आहे. यामुळे या किनाऱ्याची शांतता भंग पावली असून कुटुंबासोबत येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.
परमिट रूममध्ये जास्त पैसे खर्च करण्याऐवजी पैसे वाचवण्यासाठी अनेक मद्यपी समुद्रकिनाऱ्याला पसंती देत आहेत. शिरगाव हे शांत आणि निर्मनुष्य ठिकाण असल्याने त्यांची पसंती इथे वाढत आहे. काही स्थानिक खानावळ आणि चायनीज खाद्यपदार्थांचे स्टॉल चालवणारेही या लोकांना दारूसाठी ‘चाकणा’ (खाद्यपदार्थ) पुरवत असल्याने या गैरप्रकाराला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत आहे. मद्यपान करताना अनेकदा मांसाहारही इथेच शिजवला जातो, ज्यामुळे किनाऱ्यावर कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मद्यपींबरोबरच मध्यरात्रीपर्यंत इथे तरुण-तरुणींचे ग्रुप्स आणि प्रेमी युगलांची गर्दी वाढली आहे. काही जण मोठ्याने संगीत वाजवून धिंगाणा घालतात, तर काही युगले सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन करताना आढळतात. अशा वातावरणात कुटुंबासोबत आणि लहान मुलांसोबत येणाऱ्या पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गैरप्रकारांमुळे चांगल्या पर्यटकांची संख्या कमी होत असून समुद्रकिनाऱ्याची प्रतिमा डागाळत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कारवाईची मागणी
या वाढत्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा लोकांचे धाडस वाढले आहे. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास हा किनारा पूर्णपणे गबाळ होण्याचा आणि चांगल्या पर्यटकांना मुकण्याचा धोका आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. समुद्रकिनाऱ्यावरील दारू पिण्यावर आणि गैरवर्तनावर कडक कारवाई करणे, तसेच बाकड्यांची रचना बदलून त्यांचा गैरवापर थांबवणे आवश्यक आहे. अन्यथा हा शांत आणि सुंदर किनारा आपली मूळ ओळख गमावून बसेल आणि दारू पार्टी डेस्टिनेशन म्हणूनच ओळखला जाईल.
समुद्रकिनाऱ्यावरील बाकड्यांचा गैरवापर
शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर माळी स्टॉप जवळ पर्यटकांच्या सोयीसाठी बसण्यासाठी ठेवण्यात आलेले काँक्रिटचे बाक (आसने) आता मद्यपानासाठी वापरले जात आहेत. ही आसने समुद्राच्या दिशेने एक रांगेत न ठेवता एका चौकोनी टेबलाभोवती ठेवल्यामुळे मद्यपींसाठी ती एक प्रकारे ‘पार्टी टेबल’ बनली आहेत. यामुळे संध्याकाळ होताच इथे मद्यपींचा वावर वाढलेला दिसतो. अनेकदा इथे दारूच्या काचेच्या बाटल्या आणि प्लास्टिक ग्लासांचा ढिग पडलेला असतो. हीच परिस्थिती केळवा, माहीम आणि सातपाटी या इतर समुद्रकिनाऱ्यांवरील सुरीच्या बागेमध्येही पाहायला मिळत आहे.
अशा प्रकारच्या पार्टी करण्याबाबत यापूर्वी देखील अनेक वेळा मनाई करण्यात आली आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या नकळत असे प्रकार होत असतील तर त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत पोलिसांकडे देखील अनेकदा तक्रार केली असून पोलिसांकडून समुद्रकिनारी पेट्रोलिंग करण्यात येते. तसेच समुद्रकिनारी दोन तटरक्षक देखील नेमण्यात आले असून त्यांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.– मंगेश पाटील, ग्रामसेवक शिरगाव