पालघर : २३ मे पासून पावसाला सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यासह दणक्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी लघु व उच्च दाबाच्या वाहिन्या व तारा तुटून पडल्या होत्या. यामुळे विक्रमगड तालुक्यासह सफाळे भागातील अनेक गावांमध्ये जवळपास ४० तास विद्युत पुरवठा खंडित होता. तसेच अद्याप देखील लघु दाबाचे विद्युत खांब पूर्ववत करण्याचे काम महावितरण कडून सुरू असल्याने जिल्ह्यात काही भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात मान्सून २३ मे पासून दाखल झाला असून दुपारी तीन ते सहा दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे विद्युत खांब व तारा तुटून पडल्या होत्या. यामुळे विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, पालघर यासह अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पहिल्याच पावसात तासंतास अंधारात राहावे लागल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
पहिल्याच पावसात ३३ केवी उच्च दाबाचे २३ वाहिन्या बंद पडल्या तर रात्री उशिरा आहे २१ वाहिन्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच विक्रमगड येथे उच्च दाबाचे २८ तर लघु दाबाचे ४० विद्युत खांब कोलमडून पडले होते. यामुळे विक्रमगड तालुका जवळपास ४० तास अंधारात होता. विक्रमगड येथील सवादे व देहर्जे येथे वादळाने सर्वाधिक नुकसान झाले आहे. सफाळे येथील रामबाग येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामामुळे तिथे असलेल्या ३३ उच्च दाब वाहिनीमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा ३६ तासाहून अधिक काळ खंडित राहिला होता. यासह अनेक ठिकाणी रात्री उशिराने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला तर काही भागात अद्याप देखील कामे सुरू आहेत.
वृक्ष कोसळून वाहतुकीत अडथळा
पालघर तालुक्यातील सफाळे येथील सत्वादेवी मंदिराच्या जवळ रस्त्यावर मोठा वृक्ष कोसळल्याने दातिवरे, एडवण, कोरे आदी ठिकाणी प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी व खासगी वाहनांची ऐन संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळी पंचाईत झाली. हा वृक्ष हटवून मार्ग पूर्ववत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उशिराने पोहोचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. यासह जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या व वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली होती.
आठवडी बाजार पाण्याखाली
पालघर शहर आणि बोईसर येथे शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. दुपारी एक वाजल्यापासून काळे ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. मात्र साडेतीनच्या सुमारास अचानक वादळी वारा व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आपल्या वस्तू बचावासाठी दुकानदारांची तारांबळ उडाली.
उष्णता नाही मात्र आर्द्रतेचे प्रमाण अधिक
शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र पावसाने पुन्हा विश्रांती घेतली असून दोन दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. असे असताना वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे गर्मी व चिकटपणामुळे नागरिक हैराण झाले असून उष्णता पूर्णपणे जाण्यासाठी तीन ते चार दिवस सतत पावसाची आवश्यकता आहे.
लग्नकार्यात पुन्हा अडथळा
सहा व सात मे रोजी झालेल्या अवकाळी पावसा दरम्यान अनेक लग्नसराईत वादळी वाऱ्यामुळे मांडव उडाल्यामुळे गोंधळ उडाला होता. मे अखेरीस देखील लग्नाची अनेक मूहूर्त असल्याने अचानक कोसळणाऱ्या या पावसामुळे हळदी व लग्न समारंभात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे लग्नकार्य असणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून लग्नघरी विद्युत पुरवठा, साऊंड सिस्टीम आणि जेवणाच्या व्यवस्था कोलमडल्याने वर्हाडी हताश झाले होते.
भुयारी मार्गांमध्ये पाणी
केळवे येथील रोठा फाटक क्र ४४ येथील भुयारी मार्ग पावसात जलमय झाला आहे. तसेच पालघर नवली येथील पर्यायी भुयारी मार्गात देखील पाणी साचल्याने पूर्व पश्चिम वाहतूक करणे गैरसोयीचे होत आहे. उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक होत असून पाऊस सुरू होण्याअगोदर पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
पावसामुळे विक्रमगड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. महावितरणचे कर्मचारी पावसात व दिवस-रात्र एक करून काम करत आहेत. मान्सूनपूर्व काम देखील पूर्ण झाली असून उर्वरित कामे पुढील दोन दिवसात पूर्ण करण्यात येतील. याकरिता नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारा, रोहित्र, खांब यांना स्पर्श करू नये. असे काही आढळल्यास त्वरित महावितरणशी संपर्क साधावा.- सुनील भारंबे, महावितरण अभियंता पालघर