पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रीमियर इंटरमिजिएट प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कंपनीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. या आगीदरम्यान हायड्रोजन व एलपीजी सििलडरचे किमान १५ स्फोट झाले. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही.
तारापूर औद्योगिक वसाहतीच्या टी ५५-५७ प्लॉटमध्ये वसलेल्या या कंपनीमध्ये डाय फिनाईल मिथेन या रसायनाचे उत्पादन सुरू होते. या उत्पादन प्रक्रियेत अल्युमिनियम क्लोराइड हे अतिज्वलनशील बेंझीन द्रव्यांमध्ये टाकले जात असताना बेंझीनच्या वाफा निर्मिती होऊन मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या कंपनीमध्ये ज्वलनशील पदार्थाचा मोठय़ा प्रमाणात साठा असल्यामुळे अवघ्या काही मिनिटांत आग संपूर्ण कंपनीच्या आवारात पसरली. या आगीदरम्यान एलपीजी, नायट्रोजन व हायड्रोजन सििलडरचा स्फोट झाला. आग विझविण्यासाठी तारापूर एमआयडीसी, अदानी पॉवर, पालघर नगर परिषद यांच्यासह पाच अग्निशमन दलांच्या बंबगाडय़ांनी तीन तास शर्थीचे प्रयत्न केले. तसेच टीमा-मार्गच्या आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या अपघातामध्ये कोणताही कामगार जखमी झाला नसला तरी १५ ते १७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कंपनीत अतिज्वलनशील पदार्थाच्या साठय़ामुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याचे सांगण्यात आले.