पालघर : जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकारी वर्ग माणुसकी व सन्मानपूर्वक वागणूक देत राहिले तसेच आपल्या कर्तव्याचे पालन केले तर जिल्ह्याला लवकरच यश लाभेल. जिल्हावासियांचा जीवन स्तर उंचाविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिपादन केले.महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिवसानिमित्त जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम गणेश नाईक यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात सामान्य माणसाला केंद्रबिंदू मारून विकास कामांची आखणी केली जात असून आगामी काळात पालघर हा प्रगतिशील जिल्हा बनेल याबाबत पालकमंत्री यांनी विश्वास व्यक्त केला. राज्यातील मराठी वारसा सांभाळत जिल्ह्याची समृद्धी व संस्कृती मध्ये वाढ करण्यासाठी राज्य सरकारने विविध सकारात्मक पावले उचलत असल्याची माहिती त्यांनी दिली.मुख्यमंत्री यांनी राज्यात १०० दिवसांदरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात परिसर स्वच्छता, अभयगत्यांना आपलेपणाची वागणूक, डिजिटीलायझेशन कडे वाटचाल, कामांच्या विषयी निपटारा, नागरिकांसोबत कौटुंबिक भावना, सौर ऊर्जेतून शेतीसाठी दिवसा पाण्याची उपलब्धता, वीज दरांमध्ये कपात इत्यादी उपक्रमांचा उल्लेख करत जनसामान्यांचा विकास कामांमध्ये सहभागामुळे राज्य दमदारपणे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात प्लास्टिक व दुर्गंध मुक्त उपक्रम राबवत स्वच्छ व सुंदर जिल्हा करण्यास जिल्हा प्रशासनातील विविध घटकांचे लाभलेले सहकार्य लाभत असल्याबद्दल गणेश नाईक यांनी समाधान व्यक्त केले. मानसून पूर्व कामांचा आढावा घेताना शेतकऱ्यांना बियाण व खताचा आवश्यकतेनुसार पुरवठा होईल, पावसाळ्या दरम्यान अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील असे सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देताना शाळांमध्ये गळती होणार नाही व शाळेच्या परिसरातील स्वच्छता राखून सरपटणाऱ्या जनावरांपासून सतर्कता राखण्याबाबत त्यांनी आढावा बैठकीत सूचना दिल्याचे सांगितले. जिल्ह्यातील अधिकारी वर्गाला सर्व घटकांची सेवा करण्याची इच्छा असल्याने जिल्हा वासियांचा स्तर उंचावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी विशेष पोलीस पदक मिळणारे तसेच स्वच्छता अभियानात विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देशाचे सामर्थ्य वाढावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे देशातील नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. देशात भीतीदायक वातावरणाच्या ऐवजी आशादायक वातावरण निर्मित होऊन देशाची सामर्थ्य वाढावे या दृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.