डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील पटेल पाडा परिसरात मागील आठवड्यात फटाके फोडणे आणि मदरसाच्या अनधिकृत बांधकामावरून दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी येथील काही हिंदू कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मागील आठवड्यात झालेल्या वादानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील काही व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कारवाई केली होती. याच घटनेच्या अनुषंगाने, सोमवारी मंत्री राणे यांनी डहाणूतील जखमी हिंदू बांधवांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी मुस्लिम समाजावर जोरदार टीका करत अनेक कठोर विधाने केली.

मंत्री नितेश राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, ते आमदार-मंत्री म्हणून नव्हे, तर ‘हिंदू म्हणून’ लोकांना भेटायला आले आहेत. त्यांनी ‘हिंदू राष्ट्रांमध्ये आम्ही सर्वधर्म समभावाची ‘पिपडी’ वाजवणार नाही,’ असे सांगत हिंदू राष्ट्रात पहिले हिंदूंचे हित जपले जाईल, नंतर दुसऱ्यांचा विचार केला जाईल, अशी भूमिका मांडली.

राणे यांनी अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर कठोर इशारा दिला. “तुम्हाला हवं तिथे तुम्ही थडगं नाही उभा करू शकत,” असे सांगत त्यांनी ‘वेळेत थडगं पाडलं नाही तर देवा भाऊचा बुलडोजर चालेल’ असा थेट इशारा दिला. शरिया कायद्यावर बोलताना ते म्हणाले की, “तुमचा शरिया कायदा लागू होणार नाही. आमच्या इथे बाबासाहेबांचे संविधान चालणार.” त्यांनी डहाणू हा कोणाच्या ‘अब्बाचा पाकिस्तान नाही’ असेही सुनावले.

यावेळी मंत्री राणे यांनी काही आक्रमक विधाने केली. त्यांनी “काही लोक इथे लायकीपेक्षा जास्त वागायला लागले आहेत,” तसेच “इथे काही हिरवे साप जमा झाले आहेत,” अशी विधाने केली. त्यांनी जखमी हिंदू बांधवांबद्दल बोलताना, “हिंदू भावाच्या डोक्याला पट्टी बांधली आहे, त्याचा चुन चुन के हिसाब घेतला जाईल,” असे जाहीर केले.

शेवटी, त्यांनी प्रशासनाला ‘हिंदूंना कायदा असेल तोच इतरांनाही लावा’ अशा सूचना दिल्या. तसेच, “मी येताना व्यवस्थित तयारीमध्ये येतो,” असे सांगत त्यांनी “आज ट्रेलर दाखवायला आलोय, पुढच्या वेळेस पिक्चर दाखवायला येईल,” असा इशारा देत आपला दौरा संपवला. राणे यांच्या या वक्तव्यांमुळे डहाणूतील जातीय तणाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.