पालघर : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मे रोजी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रंगीत तालीम आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय रंगीत तालिमेच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार मेजर जनरल अजय कुमार वर्मा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे चंद्रकेतू शर्मा, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे , तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य अधीक्षक रणधीर कुमार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम तसेच आरोग्य, रेल्वे, परिवहन महामंडळ, महावितरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, वन विभाग, परिवहन, भारत संचार निगम लि. मधील अधिकारी उपस्थित होते.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात काही अपघात झाला व आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किरणोत्सर्ग (रेडिएशन) मुळे लोक बाधित होऊ नये त्यादृष्टीने त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे अपेक्षित आहे. या प्रक्रियेत जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभाग तात्काळ मदत मिळणे या दृष्टिकोनातून प्रत्येक विभागाला त्यांची जबाबदारी ची माहिती करून देणे व त्यासंदर्भात कार्य करणे तत्परता असणे आवश्यक असल्याने या सराव (रंगीत तालीम) चे आयोजन करण्यात आली आहे.
पूर्वी दर दोन वर्षांनी अशा प्रकारचा आपत्कालीन परिस्थितीत विविध शासकीय विभागातर्फे करावयाच्या कारवाई संदर्भातील अभ्यास केला जात होता परंतु २०२१ पासून तर तीन वर्षांनी आयसीसीआर अभ्यास केला जात आहे. या वर्षापासून दरवर्षी रंगीत तालीम आयोजित करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने दिनांक ६ मे रोजी दिल्ली येथून ऑनलाईन अभिमुखता (ओरिएंटेशन) बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर १३ मे रोजी टेबल टॉप अभ्यास उपक्रम (एक्सरसाइज) होणार असून १४ मे रोजी रंगीत तालीम होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये
तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या प्रतिबंधात्मक कारवाई संदर्भात सराव करण्याच्या दृष्टीने रंगीत तालीम चे आयोजन करण्यात आली असून यावेळी अणुऊर्जा केंद्रामध्ये प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नसते असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या रंगीत तालीम संदर्भात कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच या संदर्भातील अफवा असणारे संदेश प्रसारित करू नये असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.