वाडा: वाडा तालुक्यात मोकाट श्वानांची संख्या झपाट्याने वाढली १६०० हून अधिक श्वानदंश झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः बाहेरून –(जिल्ह्याबाहेरील) अन्य शहरांमधून – ट्रक किंवा खासगी वाहनांद्वारे येथे श्वान सोडले जात असल्याच्या तक्रारी वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाडा व कुडूस शहरात आणि आसपासच्या परिसरात १६०० हून श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक, सकाळी चालायला बाहेर पडणारे व व्यायाम करणारे नागरिक यांच्यावर मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये १,०१७ तर कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ६६४ असे एकूण १,६८१ श्वानदंशाच्या नोंदी झाल्या असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. या वाढत्या संख्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
वाडा व कुडूस शहरात मोकाट श्वानांचा (कुत्रे) वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोकाट श्वान हे दुचाकीस्वारांना रस्त्यावर पाठलाग करून हैराण करत आहेत अथवा चावा घेत आहेत. काही ठिकाणी श्वानांच्या टोळक्यांनी थेट हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण व शहरी रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये, वसाहतींमध्ये हे श्वान मुक्तपणे वावरताना दिसत आहेत.
जिल्ह्याबाहेरील (बाहेरून) श्वान सोडल्याचा नागरिकांचा गंभीर आरोप-
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते प्रितेश पटेल यांनी सांगितले की, रात्रीच्या अंधारात काही वाहनांतून पालघर जिल्ह्याबाहेरील भिवंडी, कल्याण, ठाणे यांसारख्या अनेक शहरांतील श्वानांचे टोळके वाडा व कुडूस या शहराबाहेरील मोकळ्या जागांमध्ये सोडले जात आहे. त्यानंतर या श्वानांची वावर हे नंतर शहराच्या मुख्य भागांमध्ये होतो. त्यामुळे त्यांची संख्या शहरात झपाट्याने वाढत चालली आहे.
हे श्वान विशेषतः वाडा, कुडूस बस स्थानक, बाजारपेठ, शाळा परिसर तसेच मुख्य रस्त्यांवर मुक्तपणे फिरताना दिसत आहेत.
बाहेरून आलेले मोकाट श्वान हे चिकन, मांस खात असल्याने ते आक्रमक बनत आहेत. त्यांचे स्थानिक श्वानांसोबत मोठ्या प्रमाणावर संघर्ष होत असल्याने थेट नागरिक, विद्यार्थ्यांवर हल्ले करताना दिसून येत आहे.
मांस विक्रेत्यांमुळे मोकाट श्वान आक्रमक –
वाडा व कुडूस शहरात मच्छी, चिकन, मांस विक्रेत्यांची दुकाने आहेत. या दुकानांजवळ फिरणाऱ्या श्वानांना खाण्यास मांसाचे टाकाऊ पदार्थ देत असल्याने त्यांची दुकानांजवळ गर्दी वाढून ते आक्रमक होत आहेत. शिवाय हे श्वान येथील दुकानात येणाऱ्या ग्राहकांना देखील चावा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
खर तर मांस विक्रेत्यांनी टाकाऊ पदार्थ हे एका टाकीत साठवणूक करणे गरजेचे असताना रस्त्यावर फेकताना दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वाडा, कुडूस शहरात निर्बीजीकरण मोहीम राबविण्याची मागणी-
मोकाट श्वानांमुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे.
वाडा व कुडूस शहरात प्रशासनाकडून लसीकरण आणि निर्बीजीकरण करिता कोणतीही व्यवस्था अथवा ठोस उपाययोजना केली नसल्याने रेबीज सारख्या आजारांचा धोका देखील वाढला आहे.
आरोग्याच्या दृष्टीनेही हे धोकादायक बनले आहे,”
दरम्यान, या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
वाडा शहरातील निर्बीजीकरण मोहीमेचा प्रभाव नाही.-
वाडा शहरात मधल्या काळात “मोकाट श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाडा नगरपंचायतीच्या माध्यमातून #श्वान “रेबीज लसीकरण व निर्बीजीकरण” मोहीम राबविण्यात आली.
#त्याचा ठेका बीड येथील युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीला देण्यात आला होता. #मात्र या राबविण्यात आलेल्या मोहिमेचा प्रभाव वाडा शहरात हवा तसा दिसून न आल्याने ही मोहीम यशस्वी झाली असल्याचे दिसून येत नाही
वाडा शहरात ५६५ श्वानांचे लसीकरण व निर्बीजीकरण केले.
याकरिता ७ लाख ७४ हजारांचा खर्च केला असल्याची माहिती वाडा नगरपंचायतीचे स्वच्छता अभियंता प्रशांत जोफळे यांनी दिली आहे.
मात्र, वाडा शहरातील श्वानांची वाढती संख्या पाहता हे निर्बीजीकरण मोहीमेवरच आता संशय व्यक्त केला जात आहे.
जानेवारी २०२५ महिन्यात सुरू केलेली निर्बीजीकरण मोहीम १३ मार्च बंद झाली. मधल्या काळात ती खंडित झाली. याच काळात टेंडर कालावधी संपून देखील पुन्हा काही कालावधीकरिता ही मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांतच ती पुन्हा बंद झाली. त्यामुळे अल्पावधीतच ५६५ श्वानांचे निर्बीजीकरण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मोहिमेत अपहार झाला असल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नागरिकांची मागणी-
मोकाट श्वानांवर त्वरित नियंत्रण ठेवावे
बाहेरून श्वान आणून सोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी
श्वान लसीकरण व निर्बंध मोहिमा राबवाव्यात
शाळा, अंगणवाडी परिसरात विशेष सुरक्षा उपाय करावेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वानदंशावरील औषधसाठा
उपलब्ध आहे, त्यामुळे रुग्णांना उपचार करताना कुठलीही अडचण येत नाही.
वाडा ग्रामीण रुग्णालय व कुडूस प्रा.आरोग्य केंद्र यांच्याकडून श्वानदंशाची (कुत्र्यांचा चावा) बाबत उपलब्ध झालेली आकडेवारी
जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ पर्यंत
महिना- वाडा ग्रा. रु ? कुडूस प्रा. आ. केंद्र
जानेवारी २०२५- ११८ – ७१
फेब्रुवारी – ११६ – ७०
मार्च – १३४ – ८३
एप्रिल – ११६ – ६८
मे – १३६ – ७९
जून – ७९ – ७५
जुलै – १०७ – ८५
ऑगस्ट – १०८ – ८३
सप्टेंबर – ११३ – ५०
एकूण # १,६८१ = १,०१७ – ६६४
श्वानदंश वर्गीकरणाचे 3 प्रकाराचे असून रुग्ण कोणत्या वर्गीकरणात मोडतात त्यानुसार त्यांच्यावर उपचार केले जातात. वर्गीकरण तीनमध्ये श्वानदंश हे खोलवर जखमा करतात त्यामुळे रुग्णांना प्राथमिक उपचार देवून संदर्भित करावे लागते.- डॉ. शरयू तुपकर, तालुका आरोग्य अधिकारी, वाडा
कुडूस ग्रामपंचायतीच्याहद्दीत श्वान लसीकरण व निर्बीजीकरण मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. – डॉ.राजेंद्र आगिवले, सहायक पशुधन अधिकारी,पशुवैद्यकीय दवाखाना, कुडूस श्रेणी 1
“बाहेरून श्वान सोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कारण ही केवळ आरोग्याची नव्हे तर सुरक्षा व कायद्याचीही गंभीर बाब आहे. –प्रितेश पटेल, सामाजिक कार्यकर्ते, कुडूस